हेरगिरी प्रकरणःपत्रकारआणि नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक !

परदेशी गुप्तचर संस्थांना गुप्त माहिती पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग असल्याच्या आरोपाखाली अटक

हेरगिरी प्रकरणःपत्रकारआणि नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक  !

परदेशी गुप्तचर संस्थांना संरक्षण खरेदीशी संबंधित संवेदनशील माहिती दिल्याच्या कथित आरोपाप्रकरणी दिल्लीस्थित मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी आणि नौदलाचे माजी कमांडर आशीष पाठक यांना सीबीआयने अटक केली आहे. रघुवंशी हे गेल्या सप्टेंबरपासून तपास यंत्रणांच्या रडारवर होते. मंगळवारी दिल्ली-एनसीआर आणि जयपूरमधील १५हून अधिक ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. रघुवंशी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन कोटी रुपये विदेशी खात्यातून आल्यानंतर ही अटक करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

रघुवंशी यांनी हे पैसे त्यांनी लिहिलेल्या लेखांसाठी मिळालेले आहेत, असा दावा केला असला तरी सीबीआयचे अधिकारी त्यांच्या उत्तरांवर समाधानी नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जण सहभागी आहेत का, याचा तपास आता सीबीआय करत आहे.रघुवंशी आणि पाठक यांच्यावर आयपीसी कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) व्यतिरिक्त सरकारी गुप्त कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

हे ही वाचा:

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री

हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ३३ वर्षांनंतर अटक

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत ‘बेस्ट’ मदतीला धावणार

देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंह यांना आणले कोणी?

छाप्यांदरम्यान एजन्सीने दोन आरोपींकडील लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाइल फोन, हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्हसह ४८ इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. देशाच्या संरक्षण आस्थापनांशी संबंधित सीबीआयच्या डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञांनी आरोपी आणि इतरांची क्लाउड-आधारित खाती, ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांमधील संग्रहित डेटा जप्त केला आहे, असे एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले. डिफेन्स न्यूज नावाच्या वेबपोर्टलसाठी काम करणारा रघुवंशी वेगवेगळ्या स्त्रोतांकडून संरक्षण खरेदीशी संबंधित गोपनीय माहिती गोळा करत होता आणि माहिती पुरवण्यासाठी त्याने अनेक परदेशी संस्थांसोबत करार केला होता, असे आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमधील डेटाच्या छाननीतून समोर आले आहे.

रघुवंशी यांना अटक केल्यानंतर त्यांनी पाठक यांची गुप्त माहिती पुरवण्याबाबतची कथित भूमिका उघड केली. दोन आरोपींमधील संभाषणांचाही सीबीआय माग काढत आहेत.
रघुवंशी यांच्या खात्यातून केल्या गेल्या काही गूढ ट्वीटचाही शोध अधिकारी घेत आहेत आणि लीक झालेली कागदपत्रे उघडण्यासाठी ते कुठल्या प्रकारचे पासवर्ड वापरत होते का, याचाही तपास केला जाणार आहे. रघुवंशी हे गेल्या सप्टेंबरपासून दिल्ली पोलिसांच्या देखरेखीखाली होते, असे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version