कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट अपघाताची घटना ताजी असताना शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घाटकोपर चिराग नगर मार्केट येथे एका भरधाव टेम्पोने ६ पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्थानिकांनी टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर मच्छी मार्केट येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शितपेयाने भरलेला छोटा हत्ती टेम्पो हा भरधाव वेगात मार्केट मधून जात असताना चालकाचे स्टेरिंगवर ताबा सुटून टेम्पो पादचाऱ्याना धडक देत टेम्पो एका भिंतीवर जाऊन धडकला.
हे ही वाचा:
संभलच्या जामा मशिदीसमोर बांधण्यात येतेय नवीन पोलीस चौकी!
मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न : १३ विद्यार्थ्यांना अटक
या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमींना तात्काळ स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले असता जखमी पैकी प्रीती रितेश पटेल (३५ ) या महिलेला मृत घोषित करण्यात आले आहे.
रेश्मा शेख (२८), मारुफा शेख ३८ तौफा शेख (३८), अरबाज (२३) आणि मोहरम शेख हे पाच जण गंभीर जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांनी टेम्पो चालक उत्तम बबन खरात (२५) याला ताब्यात घेऊन चोप देत त्याला घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. घाटकोपर पोलिसांकडून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.