रस्ता अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या बघ्यांना गाडीने दिलेल्या धडकेत नऊ ठार तर १३ जण जखमी झाल्याची घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये सरखेज-गांधीनगर मार्गावरील इस्कॉन उड्डाणपुलावर घडली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या मार्गावर पहिल्यांदा एसयूव्हीने एका डम्परला मागून धडक दिली. त्यानंतर अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली. त्यामुळे रस्त्यावर कोंडी झाली होती. तर, काही जण जखमींना मदत करण्याचे प्रयत्न करू लागले. जखमींना रुग्णालयात पाठवले जात असतानाच एक गाडी वेगाने गर्दीत घुसली. त्यामुळे तेथे असणारे लोक तब्बल २० ते २५ फूट दूर फेकले गेले, अशी माहिती अहमदाबादच्या पोलिसांनी दिली.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर नऊ कोटी फॉलोअर
मनुष्य- बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वापरणार अत्याधुनिक तंत्रज्ञान
मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ
पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका
‘रात्री सुमारे दीड वाजता पहिल्यांदा चार जखमी रुग्णालयात आले आणि त्यानंतर तीन मृतदेह आले. एकाचा अर्ध्या तासातच मृत्यू झाला. एकूण नऊ मृतदेह रुग्णालयात आले. सर्वांचे शवविच्छेन केले जात आहे,’ अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाइकांना आणि जखमींना नुकसानभरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख तर, जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.