गुजरातमधील २००८ अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी खटल्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ४९ आरोपींपैकी ३८ दोषींना यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) आणि भारतीय दंड संहिता ३०२ च्या तरतुदींनुसार फाशीची शिक्षा सुनावली आहे. इतर ११ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांनी निकाल देताना बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची नुकसान भरपाई तसेच गंभीर दुखापत झालेल्यांना ५० हजार रुपये आणि किरकोळ दुखापत झालेल्यांना २५ हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोपी उस्मान अगरबत्तीवाला याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय, न्यायालयाने ४८ दोषींना प्रत्येकी २.८५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उस्मान याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याच्या अतिरिक्त शिक्षेसह २.८८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
एका तासात २१ बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी ४९ पैकी ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवले होते. तर २८ जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणी विशेष कोर्टात १३ वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर आज या प्रकरणाचा निकाल समोर आला आहे.
हे ही वाचा:
शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी
संजय राऊत पुन्हा सोमय्यांवर घसरले
‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा
सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये सहा हजार कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीत आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले होते. त्याचबरोबर एक हजार ११७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते.