पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी जन्मठेप

दिल्ली साकेत न्यायालयाचा निर्णय

पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी जन्मठेप

पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चार आरोपींना शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर एका आरोपीला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सौम्या यांची सन २००८मध्ये हत्या करण्यात आली होती. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने हा निर्णय दिला.

हा गुन्हा दुर्मिळ नसल्याने फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. रवी कपूर, अमित शुक्ला, बलजित मलिक, अजयकुमार अशी जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय सेठी याला तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.

कार्यालयातून घरी जात असताना दिल्ली येथील नेल्सन मंडेला मार्गावर सौम्या यांची ३० सप्टेंबर २००८ रोजी हत्या करण्यात आली होती. आरोपी दरोड्याच्या प्रयत्नात असताना, ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर १८ ऑक्टोबरला पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली होती.

हे ही वाचा:

मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक,ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं!

व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार!

२६/११ दहशदवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण

रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू!

रवी, अमित, बलबिर आणि अजय या दोषींना प्रत्येकी सव्वा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर, पाचवा दोषी अजय सेठी याला मोक्का कायद्यांतर्गत साडेसात लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. ‘एक तरुण आणि मेहनती पत्रकार असलेल्या सौम्या हिला अशाप्रकारे जीव गमवावा लागणे, हे दुर्दैवी आहे. भारतात कामावर जाणाऱ्या महिलांचे प्रमाण घटत चालले आहे. कामावर जाताना आणि कामावरून येताना प्रवासादरम्यान महिलांना अशा प्रकारे अत्याचाराचा सामना करावा लागतो, हेदेखील या घसरणीमागील एक कारण आहे,’ असे न्यायालयाने निकाल देताना नमूद केले.

Exit mobile version