गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरात सलग दोन दिवस घरफोडी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. सोनू निगम यांच्या वडिलांकडे वाहन चालक म्हणून नोकरी करणाऱ्याने ७२ लाखाची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाचा कसून शोध घेण्यात येत आहे.
गायक सोनू निगम यांचे गायक वडील अगमकुमार (७६) हे अंधेरी ओशिवरा येथील विंडसर ग्रँड या इमारतीत एकटेच राहण्यास आहे. अगमकुमार यांनी मुलगी निकिता आणि सोनू निगम हे देखील वर्सोवा अंधेरी येथे वेगवेगळ्या इमारतीत राहण्यास आहे. अगमकुमार निगम यांच्याकडे ८ महिन्यांपूर्वी रेहान नावाचा वाहन चालक काम करीत होता, मात्र त्याचे काम बरोबर नसल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
हे ही वाचा:
जिच्या हाती ‘वंदे भारत’ची दोरी..
मुंबईतले रस्ते आता ‘रॅपिड’ पद्धतीने खड्डामुक्तीकडे
उद्धव ठाकरेंना कंटाळून ४० आमदार बाहेर पडले…
कपलिंग तुटले.. शान ए पंजाब एक्स्प्रेसचे दोन तुकडे, डबे मागे ठेऊन गाडी गेली पुढे
८ मार्च रोजी अगमकुमार यांना कामाचे ७२ लाख रुपये आले होते व त्यांनी ते लाकडी कपाटात ४० लाख आणि ३२ लाख डिजिटल लॉकर मध्ये ठेवले होते. १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अगमकुमार हे घराला कुलूप लावून मुलगी निकिता हिच्याकडे जेवणासाठी गेले होते. सायंकाळी अगमकुमार यांनी स्वतःच्या घरातील कपाटात ठेवलेली रोकड तपासली असता लाकडी कपाटातील ४० लाख रुपये गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब मुलीला सांगितली. मात्र त्यांनी याबाबत पोलिसाना कळवले नाही. २० मार्च रोजी सकाळी अगमकुमार हे मुलीसह व्हिसाच्या कामासाठी सोनू निगम याच्या घरी गेले होते. तेथून दुपारी परतल्यानंतर त्यांनी डिजिटल लॉकर मध्ये ठेवलेली ३२ लाखाची रोकड मिळून आली नाही.
घरी कोण आले होते याची खात्री करण्यासाठी अगमकुमार यांनी ते राहत असलेल्या सोसायटीच्या इमारतीच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ८ महिन्यांपूर्वी कामावरून काढण्यात आलेला वाहन चालक रेहान हा अगमकुमार राहत असलेल्या विंग मधून एका बॅगेसह बाहेर पडताना आढळून आला. अगमकुमार यांनी मुलगी निकिता सह बुधवारी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.