चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या

अपहरण करून उपायुक्ताच्या पत्नीला डांबून ठेवले

चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या

संपत्तीसाठी निवृत्त पोलीस उपायुक्त यांच्या मुलाचे आणि पत्नीचे अपहरण करून मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मुंबईतील चेंबूर येथे उघडकीस आली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये एक जण मृताचा नातेवाईक असून या हत्याकांडामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

विशाल वसंत कांबळे (४४) असे हत्या करण्यात निवृत्त पोलीस उपायुक्त यांच्या मुलाचे नाव आहे. निवृत्त पोलीस उपायुक्त वसंत कांबळे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहेत. वसंत कांबळे हे मूळचे कोल्हापूर येथील शाहूवाडी येथे राहणारे होते. त्यांची पत्नी रोहिणी वसंत कांबळे (८०) आणि मुलगा विशाल हे दोघे कोल्हापूर येथे राहण्यास होते, वसंत कांबळे यांची कोल्हापूर आणि मुंबईत असलेल्या संपत्तीचा त्यांच्या नातलगामध्ये वाद सुरू होता. मुंबईतील चेंबूर लालाडोंगर या ठिकाणी वसंत कांबळे यांचा एक बंगला आहे, या बंगल्याचा वाद मुंबईतील न्यायालयात सुरू आहे. मुलगा विशाल आणि आई रोहिणी हे दोघे मुंबईत न्यायालयीन कामकाजासाठी नेहमी मुंबईत येत असे व चेंबूर येथे हॉटेल नीलकमल या ठिकाणी थांबत असे.

१३ मार्च रोजी विशाल आणि आई रोहिणी हे दोघे नेहमी प्रमाणे मुंबईत न्यायालयीन कामकाजासाठी आले होते व हॉटेल नीलकमल थांबले होते. ४ एप्रिल रोजी विशाल आणि आई रोहिणी हे दोघे हॉटेल मधून सामान घेऊन न जाता बाहेर पडले होते. त्यानंतर दोघे हॉटेलवर परतले नाहीत.

 

चेंबूर येथे राहणाऱ्या रोहिणी यांची बहीण विनया फणसळकर (८०) यांनी रोहिणी आणि भाचा विशाल यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचे फोन बंद असल्यामुळे दोन दिवसांनी त्या स्वतः हॉटेल नीलकमल येथे आल्या व त्यांनी हॉटेल मॅनेजरकडे चौकशी केली असता दोघे ४ एप्रिल पासून रूम वर नाही, त्यांचे सामान रूम मध्ये असल्याचे हॉटेल मॅनेजर यांनी सांगितले. विनया यांनी २१ एप्रिल रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.

 

चेंबूर पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्ही मध्ये दोन संशयित व्यक्ती विशाल आणि रोहिणी यांना सोबत घेऊन जातांना आढळून आले. पोलिसांनी या दोघांची माहिती काढून त्याचा शोध घेतला असता मुनिर पठाण तसेच रोहित अंदमाने उर्फ मुसा पारकर या दोघांना वडाळा आणि पवई येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोघांनी आपल्या इतर पाच सहकाऱ्याच्या मदतीने विशाल याला जमीन दाखविण्याच्या निमित्ताने पनवेल येथे नेले व त्या ठिकाणी त्याची हत्या करून मृतदेह वडोदरा अहमदाबाद रोड येथे टाकला व रोहिणी यांना गुंगीचे औषध देऊन गोरेगाव आरे कॉलनी रॉयल पाम या ठिकाणी एका खोलीत कोंडून ठेवले असल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली.

हे ही वाचा:

‘द केरला स्टोरी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष ५ मे रोजी ठरणार?

ड्रोन हल्ल्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन बचावले

वृद्ध पद्म पुरस्कारविजेत्या महिलांनी पंतप्रधानांचे केले अनोखे कौतुक

चेंबूर पोलिसांनी रॉयल पाम येथून रोहिणी यांची सुटका करून ज्योती वाघमारे (३३) हिला अटक केली. सुटका करण्यात आलेल्या रोहिणी यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी हत्या,अपहरण, गुंगीचे औषध देऊन कोंडून ठेवणे, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुनीर अमिन पठाण, (४१) निलंबित बेस्ट बस चालक, रोहित अनिल अदमाने उर्फ मुसा पारकर, (४०), राजू बाबू दरवेश, (४०),ज्योती सुरेश बाघमारे (३३), प्रणव प्रदिप रामटेके (२५) यांना अटक करण्यात आली असून सायरा खान आणि इरफान शेख हे दोघे फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. चेंबूर पोलिसाचे एक पथक मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद येथे रवाना झाले आहे.

 

प्रणव रामटेके हा विशाल कांबळे यांचा नातलग असून संपत्तीच्या वादातून त्याने मुनिर पठाण याला विशाल कांबळे आणि रोहिणी कांबळे यांच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती समोर येत आहे.

Exit mobile version