दिल्लीचे सहाय्यक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान याची हत्या झाल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. या मुलाला हरियाणातील पानिपत येथील तलावात ढकलले गेल्याचा दावा अटक केलेल्या तरुणाने केला आहे. लक्ष्य (२६) २२ जानेवारीपासून बेपत्ता आहे.
व्यवसायाने वकील असणारा लक्ष्य २२ जानेवारी रोजी हरयाणातील भिवानी येथे एक विवाहसोहळ्यासाठी त्याच्या एसयूव्हीमधून गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत तिस हझारी न्यायालयात काम करणारा क्लर्क विकास भारद्वाज आणि अभिषेक सोबत होते. मात्र त्या दिवसापासून लक्ष्य घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी समयपूरबदली पोलिस ठाण्यात २३ जानेवारी रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा:
१६ व्या वर्षी पुस्तक लिहिले; ३० मिनिटांतच संपली पहिली आवृत्ती
सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार पण आता भाजपासोबत?
हबल दुर्बिणीने शोधला सूर्यमालेबाहेरील पाण्यासह एलियन ग्रह!
त्या दिवसापासून त्याचा शोध घेणे सुरू आहे. तर, १९ वर्षीय अभिषेकला पोलिसांनी शुक्रवारी दिल्लीतील नरेला परिसरातील जवाहर कॅम्पमधून ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. विकासने २२ जानेवारी रोजी आपल्याला फोन करून सोनेपत येथील विवाह सोहळ्यास बोलावले होते, असे अभिषेकने चौकशीदरम्यान सांगितले. लक्ष्यने विकासकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती. मात्र पैशांची मागणी केल्यावर तो टाळाटाळ करून गैरवर्तन करत असे. त्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला.
त्यानुसार, सोमवारी दुपारी विकास आणि अभिषेक हे दोघे मुकारबा चौक येथे भेटले आणि लक्ष्यच्या गाडीतून सोनेपत येथे गेले. त्यानंतर २३ जानेवारी रोजी पहाटे ते विवाह सोहळ्यातून घरी परतत असताना त्यांनी लक्ष्यला पानिपतजवळील तलावात ढकलले आणि ते निघून गेले. त्यानंतर विकासने त्याला नरेला येथे उतरवले आणि स्वतः गाडी घेऊन गेल्याचे अभिषेकने सांगितले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेकला अटक करण्यात आली आहे. आता पोलिस विकासच्या मागावर आहेत. तसेच, पोलिस लक्ष्यचा मृतदेहदेखील शोधत आहेत.