काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त

अपहरण करण्यात आल्याचा कुटुंबियांचा दावा

काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त

सुट्टी घेऊन घरी परतलेल्या भारतीय लष्करातील सैनिक जम्मू- काश्मीरमधून बेपत्ता झाला आहे. त्याचे अपहरण करण्यात आल्याचा दावा या सैनिकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

जावेद अहमद वणी असे या सैनिकाचे नाव आहे. तो भारतीय लष्कराचा जवान असून लेह (लडाख) येथे तैनात आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला, असे सांगण्यात आले. रजेवर घरी परतलेल्या या २५ वर्षीय सैनिकाचे जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून त्याच्या वाहनातून अपहरण करण्यात आले, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अपहृत सैनिकाचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिस आजूबाजूचा परिसर पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. घरांची तपासणी केली जात आहे. संशयास्पद व्यक्तींचीही कसून चौकशी केली जात आहे.

जावेद किराणा सामान खरेदी करण्यासाठी गाडीतून चौलगाम येथे गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात आणि आजूबाजूच्या गावांत त्याचा शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान परन्हाळ गावात त्याच्या गाडीध्ये चप्पल आणि रक्ताचे डाग आढळून आले. मात्र, रक्ताचे डाग बघून कुटुंबीयांच्या मनात विविध शंकांनी काहूर माजवले आहे. त्याला काही झाले नसेल ना, या भीतीने त्यांना पोखरले आहे.

हे ही वाचा:

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन

५०० वृक्ष तोडणाऱ्या बिल्डरला झाकणारा तो मोठा नेता कोण?

अंजू झाली आता पाकिस्तानी, परतणे कठीण

दरम्यान, पोलिसही त्याचा कसून शोध घेत आहेत. आजूबाजूच्या परिसरातील लोकांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे की काही अंतर्गत कलह याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Exit mobile version