मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील एका कैद्याजवळ सोन्याचा पट्टा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. कैद्याकडे सापडलेला हा सोन्याचा पट्टा तस्करीचा एक भाग असून सीमाशुल्क विभागाकडून हा पट्टा काढला गेला नाही आणि तो आरोपी सोबत तसाच तुरुंगात गेल्याचे समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर एका तस्कराला अटक केली होती. या तस्कराकडून सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला होता, मात्र त्याने सोन्याच्या कस पासून पेस्ट तयार करून ती पेस्ट प्लास्टिक चिकटपट्टीने चिकटवून एक पट्टा तयार केला होता व तो पट्टा पॅन्टच्या कमरेची शिलाई उसवून त्यात लपवून ठेवला होता. सीमाशुल्क विभागाच्या पॅन्टमध्ये दडवून आणलेल्या या सोन्याच्या कसच्या पट्टयाकडे लक्ष गेले नाही. आणि आरोपी तस्कराला तसेच न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हे ही वाचा:
कॅप्टन कूल म्हणतोय ‘लेट्स गेट मॅरिड’
सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली
अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…
अखेर मालाडच्या बागेतून ‘टिपू सुलतान’ला पळवून लावले
न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला आर्थर रोड तुरुंगात पाठविण्यात आले. आर्थर रोड तुरुंगात आणल्यानंतर तुरुंग रक्षकांना झडती प्रक्रियेत पँटच्या कमरेला संशयास्पद वस्तू आढळून आली, आरोपीच्या पॅन्टच्या कमरेजवळील शिलाई काढून तुरुंग रक्षक अनिल इंगळे यांनी हा सोन्याचा पेस्ट पासून तयार केलेला पट्टा ताब्यात घेऊन इंगळे यांनी ही बाब अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.
तुरुंग प्रशासनाने हा पट्टा ताब्यात घेऊन त्याचे वजन केले असता सोन्याचा कस असलेला हा पट्टयाचे वजन ७३० ग्राम असल्याचे तपासात समोर आले. तुरुंग प्रशासनाने ही सीमा शुल्क विभागाच्या लक्षात आणून दिली असून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.