नवी दिल्लीतील रोहिणी येथील न्यायालयात गुरुवारी सकाळी एक स्फोट झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. दिल्ली न्यायालयात झालेला हा छोट्या तीव्रतेचा स्फोट होता पण न्यायालयातील वकील आणि इतर कर्मचारी, न्यायालयात येणाऱ्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली.
या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांना याठिकाणी स्फोटक तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ सापडले आहेत. तसेच एक जेवणाचा डबाही सापडला आहे.
सकाळी १०.३० च्या सुमारास कमी तीव्रतेचा हा स्फोट घडून आला. एका लॅपटॉपच्या बॅगेत ही स्फोटके ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ती जागा सील करण्यात आली आहे. न्यायवैद्यक पथक आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी) यांनी ती जागा ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे.
या संदर्भातील तपास पोलिस आणि इतर यंत्रणांमार्फत सुरू असला तरी त्यात क्रूड बॉम्बचा उपयोग केला गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे किंवा तसा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संबंधित पोलिस अधिकारी प्रणव तयाल यांनी यासंदर्भात सांगितले की, एका लॅपटॉप बॅगेत ठेवलेल्या स्फोटकांमुळे ही घटना रोहिणी न्यायालयात घडली आहे. न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच हा स्फोट घडला आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आशिष शेलारांना शांत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?
सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला… राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली माहिती
‘जे बोललो त्याचा विपर्यास करुन प्रकरण वाढवले गेले’
मूळ मुद्द्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी दाखल केला गुन्हा
याआधीही, काही महिन्यांपूर्वी याच कोर्टात गुंड टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. गँगस्टरनी एकमेकांवर या न्यायालयात गोळीबार केला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. जवळपास ३० गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असलेल्या जितेंदर जोगी याला या गोळीबारात ठार मारण्यात आले होते.