बहिणीला पल्सर बाईक खूप आवडते, म्हणून तिची हौस भागवण्यासाठी तिच्या भावाने चक्क पल्सर बाईकच चोरल्याची घटना समोर आली आहे. ही बाईक चोरी करून तो बहिणीला या बाईकवरून फिरवत असे. दुसऱ्या आरोपीची बाईक चोरीला गेली म्हणूनही तो इतरांच्या बाईक चोरी करत होता, अशी माहिती बाईक चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाच्या चौकशीत समोर आली आहे. आरे सब पोलिसांनी नुकतीच बाईक चोरी करणाऱ्या त्रिकूटाला अटक केली असून, या तिघांजवळून १२ बाईक्स जप्त करण्यात आलेल्या असून या तिघांवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत.
अलंकार गुडेकर (२१), कृष्णा शुक्ला उर्फ किसन (२२) आणि सिबु कमल आदक उर्फ आकाश बंगाली (१९) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत. अंधेरी पूर्व पंप हाऊस या ठिकाणी राहणारे तिघे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तिघांचे शिक्षण बारावी पर्यत झालेले आहे. आरे कॉलनीतील मयूर मार्केट या ठिकाणी काही इसम बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती आरे सब पोलीस ठाण्यातील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सपोनि. उल्हास खोल्लम यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खोल्लम, पोऊनी.सावंत, अंमलदार बडे, भाबड , ढोक, शिंगाणे, थोरात, जानराव,काटे, गोडसे आणि चव्हाण या पथकाने सापळा रचून या तिघांना संशयावरून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यानी बाईक चोरीची कबुली दिली. पोलीस पथकाने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कसून चौकशी केली असता या तिघांनी पश्चिम उपनगरात सुमारे डझनभर बाईक चोरल्याची कबुली पोलिसांनी या तिघांकडून १२ बाईक्स जप्त करण्यात आलेल्या आहेत.
हे ही वाचा:
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे
रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे यांनीही घेतले दर्शन
पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड दलजित सिंगला नेपाळ सीमेवर केले जेरबंद
‘हा तर कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा महापालिकेचा अर्थसंकल्प…’
अटक करण्यात आलेला अलंकार गुडेकर याला एक लहान १७ वर्षाची बहीण आहे. त्याचे बहिणीवर खूप प्रेम आहे, बहिणीचे सर्व लाड अलंकार पुरवतो. बहिणीला पल्सर बाईक खूप आवडते म्हणून त्याने पहिल्यांदा पल्सर बाईक चोरली व बहिणीला दाखवली. मित्राची बाईक असल्याचे सांगून तो बहिनीला बाईक वर फिरवायचा. काही दिवसांनी तो दुसरी पल्सर बाईक चोरी करून बहिणीला तिच्यावर फिरवून तिची हौस पूर्ण करीत होता. तर कृष्णा शुक्ला याची स्वतःची बाईक दोन वर्षांपूर्वी चोरीला गेली होती. त्याची बाईक मिळत नाही म्हणून त्याने दुसऱ्याच्या बाईक चोरी करायचा सपाटा लावला होता. हे तिघे बाईक्स चोरी करून त्याची विक्री न करता स्वतः त्या वापरत होते, बाईकचे पेट्रोल संपले की बाईक एका ठिकाणी उभी करून दुसरी बाईक चोरी करायचे अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.