मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही एक सदस्यीय समिती असणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल हे या चौकशी समितीचे प्रमुख असणार आहेत. न्यायमूर्ती चांदीवाल यांना पुढच्या सहा महिन्यात आपल्या चौकशीचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भागात सिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दर महिना शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. सिंह यांच्या या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती.
हे ही वाचा:
इंदुरीकर महाराज यांच्या विरोधातील खटला रद्द
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी
परमबीर यांचे आरोप गंभीर असून या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यासंबंधीची मागणी बोलून दाखवली होती. त्यानंतर स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर यांच्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारतर्फे कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
दरम्यान परमबीर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर यांच्या याचिकेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या आदल्या दिवशीच ठाकरे सरकारकडून एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला गेला आहे.