ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

सीबीआयच्या तपासाला वेगळे वळण

ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता

ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान, सीबीआयने रेल्वे अपघातप्रकरणी सिग्नल ज्युनिअर इंजिनिअरची चौकशी केली होती. या रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच या तपासाला आता वेगळे वळण मिळाले आहे. सीबीआयने चौकशी केलेला हा इंजिनिअर सध्या आपल्या कुटुंबीयांसह गायब झाला आहे.

सीबीआयने सोमवार, १९ जून रोजी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनिअर इंजिनिअर अमीर खान याचे घर सील केलं आहे. बालासोरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा हा इंजिनिअर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासात या जुनिअर इंजिनिअरची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी सीबीआय पथक पुन्हा आल्यानंतर हा इंजिनिअर त्याच्या घरी नसल्याचे लक्षात आले. सीबीआयने त्याचे घर सील केलं आहे.

ओडिशा अपघात दरम्यान सिग्नल यंत्रणेशी छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला. दरम्यान, ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. या अपघातात २८७ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले होते.

हे ही वाचा:

‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराला आर्थिक रसद?

ठाकरेंच्या अडचणी वाढणार, कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना

टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता

कसा झाला अपघात?

कोरोमंडल एक्स्प्रेस संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाईनमध्ये गेल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. पुढे कोरोमंडल एक्स्प्रेसवर बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. इतिहासातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी हा एक अपघात असल्याचं समजलं जातं.

Exit mobile version