बदलापूर पूर्व येथील नामांकित शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. यानंतर या प्रकरणाची दखल घ्यायला शाळा प्रशासनाने आणि पोलिसांनी विलंब केल्याने बदलापूरमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. नागरिकांनी संताप व्यक्त करत तीव्र आंदोलन केले. संतप्त प्रवाशांनी रेल रोकोही केला. यानंतर या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेत योग्य कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊनही कारवाई करण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचे निदर्शनास आले आहे, असे कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच या शाळेमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध असूनही ते बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपण शासन निर्देशाचे उल्लघंन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिशीत म्हटले आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांनाही सेवेतून कमी करण्यात आले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात खाजगी शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. परंतु, बदलापूरमधील संबंधित शाळेत सीसीटीव्ही उपलब्ध असूनही ते बंद स्थितीत असल्याचे निदर्शनास आले असून शाळेने नियमांचे उल्लंघन केले आहे.
हे ही वाचा :
अलिशान कार, कोट्यवधींची घड्याळे जप्त करत मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक
उद्रेकानंतर बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद; जमावबंदी लागू
बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांवर अखेर पोलिसांचा लाठीमार !
टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !
लैंगिक अत्याचाराप्रकरणी शाळेने संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक विलंब करत उदासीनता दाखविली. हे प्रकरण गंभीरतेने न हाताळल्याने शिक्षण विभागाची प्रतीमा मलीन झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.