सराईत गुंड शिवा शेट्टीचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस जखमी

सराईत गुंड शिवा शेट्टीचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस जखमी

सराईत गुंड शिवा शेट्टी याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर शिवा शेट्टी आणि त्याच्या साथीदाराने चाकूने हल्ला केला आहे, या हल्ल्यात दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री कांजूरमार्ग पूर्व येथील कर्वे नगरमध्ये घडली. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असून शिवा शेट्टीसह इतर हल्लेखोरांनी पोबारा केला आहे.

सतीश ढवळे आणि संजय चकोर असे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराची नावे आहेत. ढवळे आणि चकोर हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. स्थानिक गुन्हेगार आणि सराईत गुंड शिवा शेट्टी हा कांजूरमार्गमधील कर्वे नगर या ठिकाणी येणार असल्याची माहिती कांजूरमार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एका पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस अंमलदार यांचे पथक त्याला अटक करण्यासाठी रविवारी रात्री कर्वे नगरात दाखल झाले होते. पोलीस आल्याची माहिती मिळताच शिवा शेट्टी हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस अंमलदार ढवळे आणि चकोर यांनी त्याला पाठीमागून पकडले. शिवाला पोलिसांनी पकडल्याचे कळताच त्याचे इतर साथीदार पुढे आले व त्यांनी चॉपर, चाकूने पोलिस पथकावर हल्ला चढवला.

पोलिस पथकाकडे लाठ्याशिवाय कुठलेही हत्यार नसल्यामुळे त्यांना हल्ला परतवून लावता आला नाही. या दरम्यान शिवा शेट्टी याने पोलिसांच्या तावडीतून सुटका करून स्वतःजवळील हत्याराने पोलीस अंमलदार ढवळे आणि चकोर यांच्या पाठीवर वार करून तेथून पोबारा केला. शिव शेट्टी आणि त्याचे इतर पाच ते सह सहकारी तेथून पळून जाण्यास यशस्वी ठरले मात्र त्याचा एक सहकारी पोलिसांच्या हाती लागला. जखमी अंमलदाराना तातडीने मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सुरुवातीला त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक

या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’

डाव्याच नव्हे तर उजव्या एनजीओंचेही परवाने रद्द

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

“दोन्ही पोलीस अंमलदाराची प्रकृती स्थिर असून शिवा शेट्टी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे. शिवा शेट्टी यांचयाविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असून त्याला अटक करताच त्याच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कदम यांनी दिली.

Exit mobile version