जमीन मालकाचा मृत्यू झाला असतानाही तो जिवंत असल्याचे दाखवत जागा बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा आणि पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय तसेच पुणे पोलीस उपायुक्त परिमंडळात जमिनीचे मालक संदीप दाभाडे यांनी तक्रार नोंदवली आहे.
संदीप दाभाडे यांची वडिलोपार्जित जमिनीचे कुलमुखत्यार पत्र त्यांचे पिता गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम शत्रुघ्न सिन्हा व कुश सिन्हा यांना २००२ व २००४ मध्ये दिले होते. गोरख दाभाडे सन २००७ साली मृत झाल्यावर ते मुखत्यारपत्र कायदेशीररित्या गैरलागू ठरले. आणि संदीप दाभाडे आणि त्यांचे भाऊ-बहिण हे वडिलोपार्जित संपत्तीचे मालक झाले.
मात्र, परवानगी न घेता व गोरखनाथ दाभाडे मृत झाल्यानंतरदेखील ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन २००९-२०१० मध्ये सिन्हा कुटुंबीयांनी तयार केले. आणि त्या कागपत्रांचा वापर करून त्यांनी स्वतःचे व साथीदारांच्या नावे त्या जमिनीचे विक्रीपत्र नोंदवले. ७/१२ वर फेरफार करतांना महसूल विभागाने त्याच्या नोटीसा दाभाडे कुटुंबियांना दिल्या नाहीत व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, राजकीय लागेबांधे वापरून पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा व त्यांच्या साथीदारांनी स्वतःच्या नावे करून घेतली.
हे ही वाचा:
अँटिलिया प्रकरणातील नरेश गौरच्या सुटकेचा मार्ग मोकळा
‘एकटे निवडणूक जिंकता येत नाही म्हणून शिवसेनेची जोडतोड करून सत्ता’
लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोची शरम कशाला वाटायला हवी?
याप्रकरणी संदीप दाभाडे हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर यांनी ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. म्हणून मग ईमेलद्वारे दाभाडे यांनी बंडगार्डन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ही तक्रार पाठवली. सर्व कागदोपत्री पुराव्यासह सक्तवसुली संचालनालय (ईडी) येथे ईमेल द्वारे ही तक्रार दिली पाठवली आहे.
गोरखनाथ दाभाडे हे २००९ मध्ये मृत झाले होते. पण त्यांच्या नावाने अर्ज गैरमार्गाने शेती खरेदीची परवानगी उप विभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालायातून मिळविली. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारी दिल्या पण कोणताही उपयोग झाला नाही, असे संदीप दाभाडे म्हणाले.