दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

उत्तर-पूर्व दिल्लीत सन २०२०मध्ये झालेल्या दंगलीत एका पोलिसावर बंदूक रोखणाऱ्या शाहरुख पठाणला सशर्त जामीन मिळाला आहे. शाहरुखवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याने त्याला कैदेत ठेवण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने जामीन देताना नमूद केले आहे. अर्थात शाहरुख हा दंगलीच्या अन्य एका प्रकरणातही आरोपी असल्याने त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

 

कडकडुम्मा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी हा आदेश दिला. पठाण हा अन्य एका प्रकरणातही आरोपी आहे. ज्यामध्ये झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. ही घटना २४ फेब्रुवारी २०२० रोजी झाली होती. न्यायालयाने त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तितक्याच रक्कम भरल्यानंतर त्याला जामीन मंजूर केला. ‘या प्रकरणात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जामिनावर राहून आरोपी या साक्षीदारांवर दबाव आणू शकत नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र न्यायालयाने त्याला दिल्लीबाहेर न जाण्याच्या तसेच, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना केल्या आहेत.

हे ही वाचा:

‘अमेरिका सदैव इस्रायलच्या पाठिशी’!

एअर इंडियाकडून इस्रायलची विमानसेवा रद्द!

कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

शाहरुख याला ३ एप्रिल २०२० रोजी अटक करण्यात आली होती. तीन वर्षे तो न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणी त्याच्या सहआरोपींना आधीच जामीन मिळाला आहे. सन २०२०मध्ये दिल्लीतील दंगलीत जाफराबाद-मौजपूर भागातील काही हिंसाचाराच्या घटनांचे चित्रिकरण व्हायरल झाले होते. त्यामध्ये शाहरुख एका पोलिसावर बंदुक रोखताना दिसत आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. तसेच, त्याने दंगल आणि हिंसाचारादरम्यान गोळीही चालवली, अशीही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version