प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ताब्यात घेतल्याचे आता निश्चित झाले आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ज्या क्रूझवर रात्री एनसीबीने कारवाई केली, त्यात आर्यन खानसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची एनसीबी मार्फत चौकशी सुरू आहे.
या आठ जणांत आर्यन खानसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांचा समावेश आहे.
मुंबईहून गोवा कडे निघालेल्या क्रूझवर रंगलेल्या पार्टीवर नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत काही लोकांना ताब्यात घेतले तसेच ड्रग्सही जप्त केले. रात्री केलेल्या या कारवाईमुळे या पार्टीचा सारा रंग उतरला.
या पार्टीत बड्या उद्योगपतींची मुले आणि काही बॉलिवूड कलाकार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. ही कारवाई शनिवारी दुपारी भरसमुद्रात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
शाहरुख खानचा मुलगा क्रूझ छापाप्रकरणी ताब्यात?
उलट्या मार्गाने जाणाऱ्या १३० दुचाकीस्वारांना पोलिस रोज करताहेत सरळ
क्रूझवर रंगली पार्टी, भरसमुद्रात एनसीबीची कारवाई
तुमच्या राजकारणापायी शेतकऱ्यांचा बळी देऊ नका
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबई बंदरातून गोवा येथे जाणाऱ्या क्रूझ मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणण्यात आले असून भरसमुद्रात रेव्ह पार्टी सुरू होणार आहे, अशी माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे हे आपल्या पथकासह या क्रूझवर हजर होते.
एनसीबीचे पथक क्रूझवर होणाऱ्या पार्टीवर नजर ठेवून असताना भरसमुद्रात क्रूझ दाखल होताच हळूहळू पार्टीला रंग चढू लागला. या पार्टीत मोठ्या प्रमानात ड्रग्स घेतले जात असल्याचे कळताच एनसीबीने रंगलेल्या पार्टीत छापा टाकून अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करून एकाला ताब्यात घेतले.