नेरूळमध्ये अल्पवयीन मुलीवर बेशुद्धावस्थेत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेरुळमधील १५ वर्षीय मुलीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून दोन तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विशेष म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीनेच तिला शीतपेयातून दारू पाजून तिला आरोपींच्या ताब्यात दिल्याचे उघडकीस आले आहे. नेरूळ पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कालमाखाली गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी ही घटना घडली होती. सदर मुलगी व्यसनाधीन झाल्यामुळे आईने तिच्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
नोव्हेंबर २०२० मध्ये ही घटना घडली होती. पीडितेच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रिणीने तिला जुईनगर येथील उद्यानात खेळाच्या बहाण्याने नेले होते. उद्यानातच तिने पीडितेला शीतपेयातून दारू पाजली. नंतर दोन तरुणांना बोलावून घेतले. तरुणांनी पीडितेला त्याच अवस्थेत एका इमारतीमध्ये नेले. दुसऱ्या दिवशी पीडितेला शुद्ध आल्यावर तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. कपडे ओले झाल्याने काढून ठेवल्याचे पीडितेच्या मैत्रिणीने तिला त्यावेळी सांगितले. त्यानंतर तरुणांनी पीडितेला एका खोलीत नेऊन इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यासाठी तरुणांनी पैसे दिल्याचे आणि ती इथेच राहिल्यास तिचा फायदा होईल, असे पीडितेच्या मैत्रिणीने तिला सांगितले. त्यानंतर तिला परत दारू पाजून बेशुद्ध करण्यात आले. तिसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावर संधी मिळताच पीडितेने तेथून पलायन करून आपले घर गाठले.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम
घटनेनंतर पीडिता व्यसनाधिन झाल्यानंतर तिच्या आईने खारघर येथील युवा चाईल्ड लाईन संस्थेला संपर्क साधला; मात्र पीडितेचने संस्थेच्या सदस्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ठाणे बालकल्याण समितीने पीडितेचे समुपदेशन करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास युवा चाईल्ड लाईन संस्थेच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यानुसार पीडितेला विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांनी तिचे समुपदेशन केल्यावर तिने घडलेल्या प्रकारची माहिती त्यांना सांगितली आणि सबंधित प्रकरण उघडकीस आले.