पाकिस्तानातील स्वात जिल्ह्यातील कबाल शहरात दहशतवादविरोधी विभागाच्या पोलिस स्टेशनवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आत्मघातकी हल्लेखोराने पोलिस स्टेशनमध्ये स्वतःला बॉम्बने उडवले. हा स्फोट इतका भीषण होता की, पोलीस ठाण्याची इमारत कोसळली. पोलिस ठाण्यावर झालेल्या संशयित आत्मघातकी हल्ल्यात १२ पोलिस ठार आणि ४० पेक्षा जास्त जखमी झाले. या हल्ल्यानंतर खैबर पख्तुनख्वामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार पोलिस स्टेशनच्या आवारात रात्री ८. २० हा वाजता स्फोट झाला. पोलिस स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये दहशतवाद विरोधी विभाग आणि एक मशीद देखील आहे. पोलिस स्टेशनच्या आत दोन स्फोट झाले आणि इमारत उद्ध्वस्त झाली. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलिस अधिकारी शफी उल्लाह यांनी सांगितले.
स्फोटांमध्ये पोलीस ठाण्याचे छत कोसळले, त्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले.सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे डीपीओ स्वात शफीउल्ला यांनी म्हटले आहे.स्फोटामुळे तीन इमारती कोसळल्या आहेत. स्फोटानंतर लगेचच पोलीस ठाण्याला आग लागली असे त्यांनी सांगितले.
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहम्मद आझम खान यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करून झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी या स्फोटाचा निषेध केला आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. दहशतवादाचा हा शाप लवकरच समूळ उखडला जाईल, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली
नरेंद्र मोदींची लोकप्रियता उद्धव ठाकरेंची पोटदुखी
हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर
यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !
दहशतवादी त्यांच्या ताज्या हल्ल्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणार्यांना लक्ष्य करत आहेत. सुरक्षा यंत्रणांनीही दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. विशेष म्हणजे, सरकार आणि दहशतवादी संघटना टीटीपी यांच्यातील युद्धविराम संपुष्टात आल्यानंतर, गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये असे हल्ले वाढले आहेत आणि टीटीपीने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.