व्यापाराकडील दागिन्यांची बॅग खेचून पळ काढणाऱ्या सात चोरट्यांना अंधेरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंधेरीतील पश्चिम द्रुतगती मार्गावर असणाऱ्या गुंदवली बस थांब्याजवळ ही घटना घडली.
चोरीनंतर हे आरोपी मद्य खरेदीसाठी गेले आणि मद्याच्या दुकानातील सीसीटीव्हीच्या चित्रणावरून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना मध्यप्रदेशच्या सीमेवरून आणि राजस्थानमधून अटक केली. महेंद्र मोर, मनोज मेढे, आमीन शेख, शशिकांत कोलवालकर, विजयकुमार गुप्ता, मनीष दर्जी आणि शैतानसिंग राजपूत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चोरी करण्यासाठी मीरा रोड आणि शिवाजीनगर येथील दोन टोळ्या एकत्र आल्या होत्या. महिनाभर त्यांनी परिसराची रेकी केली होती. दहिसर येथील पटेल इंडस्ट्रीत कामाला असलेले मधुकर काविनकर हे सोन्याच्या ७७ बांगड्या घेऊन झवेरी बाजारात सराफा व्यापाऱ्याला देण्यासाठी निघाले होते. ते बस मधून प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्या भोवती घोळका केला. त्यांच्यातील एका चोरट्याने त्यांच्याजवळील बॅग धारदार चाकूने कापून पळ काढला आणि त्याचवेळी इतरांनी चोरटा विरुध्द दिशेला गेल्याची बतावणी करत त्यांची दिशाभूल केली. या प्रकरणी काविनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
हे ही वाचा:
शिक्षणसम्राट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुडघे
संजय राठोड करतो लैंगिक छळ…यवतमाळ पोलिसांना पीडित महिलेचे पत्र
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक
फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पगार यांच्या पथकाने तपास सुरू केला. शहरातील सीसीटीव्ही चित्रणांची पडताळणी करून प्रथम पोलिसांनी मध्य प्रदेशच्या सीमेवरून पाच जणांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता लंपास केलेले दागिने राजस्थानमध्ये विकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून पोलिसांनी १४ लाखांचे दागिने हस्तगत केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी दिली. हे सर्व आरोपी सराईत चोर असून मुंबईमध्ये त्यांनी अनेक चोरीचे गुन्हे केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.