स्कूटी म्हणजे खरे तर केवळ दोघांनीच बसण्याचे वाहन. मात्र अनेकदा त्यावर दोघांपेक्षा अधिक जणही बसलेले आढळतात. कधी त्यात आई-वडिल आणि छोटे मूल बसलेले दिसतो. मात्र मुंबईत नुकतेच एका स्कूटीवर तब्बल सात मुले बसल्याचे आढळले. हा स्कूटीचालक या सात मुलांना स्कूटीवर बसवून मुंबईच्या रस्त्यांवरून फिरवत होता. स्वत:सह या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
सात अल्पवयीन मुलांना स्कूटीवरून फिरवणाऱ्या या स्कूटीचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या व्हिडीओमधील मुनव्वर शाह (३९) या तादडेव येथील नारळविक्रेत्याला सोमवारी अटक केली.
या स्कूटीवर एक मुलगा समोरच्या पायाच्या जागेवर उभा आहे, दुसरा डावीकडे चिकटून आहे, तर तिसरा थोडा मोठा मुलगा मागे उभा आहे. तर, अन्य तिघे मध्ये बसले आहेत, असे दिसत आहे. ही मुले सहा ते १४ वयोगटातील आहेत. या सात मुलांपैकी चार मुले शाह यांची आहेत, तर इतर तीन त्याच्या शेजारची आहेत, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. गणवेश नसल्यामुळे तो त्यांना शाळेत किंवा शिकवणी वर्गात घेऊन जात होता, असेही पोलिस म्हणाले. मात्र शेजाऱ्यांना मदत करताना त्याने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आता हा अडचणीत आला आहे.
‘त्याने या सर्व मुलांचा जीव धोक्यात टाकला. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असे वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. शाह याच्याविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या दुचाकीस्वाराला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती ताडदेव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक शेंडे यांनी दिली.
हे ही वाचा:
‘आम्ही सलमान खानला ठार मारूच’ गँगस्टर गोल्डी ब्रार याची दर्पोक्ती
पुतिन म्हणाले की, म्हणून ‘वॅगनर’ बंडखोरांना सोडले
यंदा अमेरिकेला ८०६ टन आंब्याची निर्यात
मणिपूरमध्ये सैनिकांच्या कामात महिलांचा अडथळा
स्कूटरवरील हा व्हिडीओ २१ ते २४ जून दरम्यानचा असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, ही घटना ताडदेव सर्कल ते मुंबई सेंट्रल येथील बेलासिस रोड दरम्यान घडली. सोहेल कुरेशी या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले होते. त्यानंतर दुचाकीस्वाराचा माग काढून त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. स्कूटरवर जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यासह शाह याने अन्य नियमांचेही उल्लंघन केले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
दुचाकी चालवताना त्याने हेल्मेट घातले नव्हते. तसेच, त्याने दुसऱ्या व्यक्तीकडून स्कूटर खरेदी केली होती, परंतु ती त्याच्या नावावर केली नव्हती. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांना थोडा वेळ लागला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शाह याने नंबर प्लेटमध्येही छेडछाड केली होती. पोलिसांनी त्याची स्कूटर जप्त केली आहे.