उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील ९ महिलांच्या हत्येमागे उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘सिरियल किलिंग’ (बरेली सीरियल किलर) असल्याचा संशय व्यक्त केला आहे. १४ महिन्यांत आतापर्यंत ९ महिलांची हत्या झाली आहे. या सर्व महिलांची हत्या एकाच प्रकारची असल्याचे दिसून आले आहे. दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६ किलोमीटरच्या परिघात या हत्या करण्यात आल्यापासून सर्व महिलांना शेतात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात मारण्यात आले आहे. या सर्वांचे वय ४५ ते ५५ या दरम्यान आहे. दरम्यान, या प्रकरणी यूपी पोलिसांनी तीन संशयितांची रेखाचित्रेही जारी केले आहेत. डीजीपी प्रशांत कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली आहे.
डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, पोलीस सहा महिन्यांपासून या खुनांचा तपास करत आहे. हत्येच्या पद्धती लक्षात घेऊन, त्यामागे सीरियल किलर असण्याची शक्यता टीमने वर्तवली आहे. माहितीच्या आधारे ३ संशयितांची रेखाचित्रे जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत बरेली पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत तीन संशयितांची रेखाचित्रे जारी केली आहेत. संशयितांबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य म्हणाले की, आतापर्यंत महिलांची झालेली हत्या ही दुपारच्या वेळेस गळा आवळून झाली आहे. यानंतर त्यांचा मृतदेह शेतात फेकून दिल्याचे निदर्शनास आले. पोस्टमॉर्टममध्ये लैंगिक अत्याचाराची कोणतीही चिन्हे आढळली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आता अलीकडे जामिनावर सुटलेल्या किंवा शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांची चौकशी सुरु आहे.
हे ही वाचा:
विनेशला हरयाणा सरकारकडून ४ कोटी !
दादर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ उकलले !
बांगलादेशी भारतात घुसत होते, सीमासुरक्षा दलांनी रोखले
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त
दरम्यान, हा प्रकार वापरून पहिला खून गेल्या वर्षी जून महिन्यात झाला होता. नोव्हेंबर २०२३ पर्यंत मृतांची संख्या ८ झाली होती. यावर्षी ३ जुलै रोजी शाही शिशगड परिसरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह शेतात आढळून आला होता. याप्रकरणी तिघांना अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही खुनाची मालिका सुरूच होती. दरम्यान, बरेली पोलिस काही काळापासून सार्वजनिक ठिकाणी जाऊन महिलांना जागरुक करत आहेत.