सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमधील भारत- पाकिस्तान सीमेवरील रावला येथे दोन किलोग्राम हेरॉईन जप्त केली आहे. या अंमलीपदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे १० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईबाबत बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बीएसएफचे जवान आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देत असताना पाकिस्तानकडून ड्रोनचा आवाज ऐकू आला. यावेळी दक्ष असलेल्या जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार करत परिसरात शोध मोहीम राबवली असता ड्रोनमधून दोन पाकिटे पडलेली आढळून आली. ही पाकिटे जप्त करून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल दोन किलोग्राम हेरॉईन आढळून आले. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १० कोटी रुपये इतकी किंमत आहे.
पंजाब आणि राजस्थान सीमेवर पाकिस्तानकडून तस्करीसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. दिवसागणिक हे प्रमाण वाढले असून यापूर्वी देखील २० जून रोजी राजस्थानच्या घडसाना येथे बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर (एलओसी) हेरॉईन जप्त केले होते.
हे ही वाचा:
आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही
उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो
जामिनासाठी रचला बनाव; पत्नीला मेंदूचा आजार पण दाखविली हाडाची शस्त्रक्रिया!
अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना
२०२१ च्या तुलनेत भारतीय हद्दीत पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सुमारे २३० ड्रोन दिसले होते. तर, २०२१ मध्ये ही संख्या १०४ इतकी होती आणि २०२० मध्ये हा आकडा ७७ होता.