सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसराला वेढा घातला असून अजूनही शोधमोहीम सुरू

सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या भागात अजूनही लष्कराच्या जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. माहितीनुसार, बारामुल्लाच्या टप्पर क्रेरी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सध्या सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला परिसरात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक गोळीबार केला. यानंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. दरम्यान, या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, जम्मू विभागातील किश्तवाड जिल्ह्यामधील चत्रू गावातही दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे. शुक्रवारी दहशतवाद्यांच्या गटाशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, दोन जण जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या छत्रू भागातील नैदघम भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार घेराबंदी आणि शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात चार जवान गंभीर जखमी झाले होते. यातील दोन जवानांना वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. नायब सुभेदार विपिन कुमार आणि भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सचे कॉन्स्टेबल अरविंद सिंग हे हुतात्मा झाले.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा

विनेशचा दावा खोटा!; ऑलिम्पिकमध्ये कोणतीही मदत मिळाली नसल्याचा केला होता आरोप

हिमाचलमध्ये आणखी एक अनधिकृत मशीद; हिंदू संघटनांचा आरोप !

पोर्ट ब्लेअरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’

जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी डोकं वर काढल्याचा अंदाज असून लष्कराकडून आणि जम्मू- काश्मीर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरु आहे.

Exit mobile version