जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांना इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर याची माहिती बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला देण्यात आली असून हे पथक घटनास्थळी पोहचले आहे. या प्रकरणी तपास केला जात आहे.
बुधवार, १९ मार्च रोजी बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाला एक संशयास्पद इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) आढळून आले. बांदीपोरा- श्रीनगर रस्त्यावर संशयास्पद आयईडी आढळून आला. नियमित गस्त घालत असताना सनसेट पॉइंटजवळ रस्त्याच्या कडेला प्रेशर कुकरच्या आकाराचा आयईडी आढळला. यानंतर याची माहिती तातडीने बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला देण्यात आली. बॉम्ब निकामी करणारे पथक आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. ही वाहतूक काही वेळातच सुरू होईल. याबाबत अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दुसऱ्या एका घटनेत, सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मूमधील १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ओव्हरग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) आणि हायब्रिड दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर शोध घेण्यात येत आहे. कारवाईचा एक भाग म्हणून या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली.
हे ही वाचा..
लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी लालूप्रसाद यादव ईडी कार्यालयात
बांगलादेश: शाह आलमकडून सहावीत शिकणाऱ्या हिंदू मुलीवर बलात्कार!
सुनीता विल्यम्स यांच्या पुनरागमनानंतर झुलासन गावात जल्लोष
तुमचा अतूट निर्धार लाखो लोकांना प्रेरणा देईल
तर, सोमवारी जम्मू आणि काश्मीर पोलिस, भारतीय लष्कराच्या संयुक्त कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. कुपवाडाच्या हंडवाडा येथील खुर्मुर जंगलाच्या सामान्य भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत विशेष गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती. यादरम्यान सुरक्षा दलाला हे यश मिळाले.