पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी नो ड्रोन फ्लाय झोनमध्ये एक ड्रोन दिसला. पोलिसांनी ड्रोन खाली उतरवून आपल्या ताब्यात घेतले. याप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. नो ड्रोन फ्लाय झोनवर ड्रोन का उडवण्यात आले याची माहिती गोळा करण्यात पोलीस व्यस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
गुरुवारी गुजरातच्या बावला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होती. या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतरही काही लोकांनी येथे ड्रोन उडवण्याचे धाडस केले. एका खासगी छायाचित्रकाराने सभेच्या ठिकाणाजवळ व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी ड्रोन उडवले. मात्र, पोलीस आणि एसपीजीला पाहताच सुरक्षा कर्मचारी पळू लागले. तत्काळ प्रभावाने एसपीजीने ड्रोन खाली उतरवले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकुल रमेशभाई परमार, राकेश कालूभाई भारवाड आणि राजेशकुमार मांगीलाल प्रजापती अशी आरोपींची नावे आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपींकडून कोणतेही संशयास्पद साहित्य सापडले नाही. ड्रोनमध्ये स्फोटक नव्हते मात्र, नो ड्रोन फ्लाय झोनवर ड्रोन का उडवले, याची माहिती गोळा करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे राज्यपालांवर घसरले!
एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांना टिकली, बांगडीबद्दल सूचना
पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!
पोलिसांनी तिघांनाही भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये अटक केली आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ते सामान्य फोटोग्राफीसाठी तेथे गेले होते आणि त्यांना या भागात ड्रोनला बंदी असल्याचे माहीत नव्हते. व्यक्तींचा कोणताही पोलिस रेकॉर्ड किंवा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नाही.
याआधीही पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी खळबळ उडाली होती.