उत्तर प्रदेशमधील बहराइच हिंसाचारातील राम गोपाल हत्या प्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी चकमकीत या प्रकरणातील मुख्य आरोपी सरफराज आणि तालिबला अटक केली आहे. यावेळी चकमक झाली असून चकमकीदरम्यान दोन्ही आरोपींच्या पायात गोळी लागली. गोळी लागल्याने जखमी झालेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी नानपारा सीएचसीमध्ये दाखल केले, तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
बहराइचच्या महाराजगंज हिंसाचार प्रकरणातील राम गोपालला गोळ्या घालणारा मुख्य आरोपी सरफराज आणि त्याचा मोठा भाऊ तालिब यांच्यासोबत गुरुवारी एसटीएफ आणि पोलिसांची चकमक झाली. ही चकमक नानपारा कोतवाली भागात, कुर्मीनपुरवा हांडा बसरी येथे दुपारी दोनच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक करण्यासाठी घेराव घातला. पोलीस आणि एसटीएफने आपल्याला घेरलेले पाहून सर्फराज आणि तालिबने गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून पोलीस आणि एसटीएफनेही गोळीबार केला. ज्यात सरफराजच्या डाव्या पायात गोळी लागली आणि तालिबला उजव्या पायात गोळी लागली. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन्ही आरोपींना पोलीस रुग्णवाहिकेतून नानपारा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
हे ही वाचा..
झाकीर नाईकच्या व्हिडीओंनी प्रभावित होऊन सलमानने मुथ्यालम्मा मंदिरात केली तोडफोड
झाकीर नाईक आता पाकिस्तानचा पाहुणा
नऊ बलुच विद्यार्थ्यांचे पाक अधिकाऱ्यांनी केले अपहरण
बाबा सिद्दीकींवर झाडलेल्या गोळ्या टर्किशमेड पिस्तूलातील!
रविवारी, १३ ऑक्टोबर रोजी इस्लामिक कट्टरवाद्यांनी बहराइचमधील दुर्गा विसर्जन यात्रेवर हल्ला केला होता. त्याचवेळी २२ वर्षीय तरुण राम गोपाल मिश्राची इस्लामिक कट्टरवाद्यांनी हत्या केली होती. राम गोपाल मिश्रा यांचा शवविच्छेदन अहवाल बुधवार, १६ ऑक्टोबर रोजी समोर आला. माहितीनुसार, राम गोपाल मिश्रा याची हत्या करण्यापूर्वी त्याला विजेचा धक्का देण्यात आला, त्याच्या पायाची नखे काढण्यात आली, त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आणि त्याच्या शरीरात ३५ हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.