संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळणार, भाऊ धनंजय देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आमदार सुरेश धस यांनी दिली माहिती

संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळणार, भाऊ धनंजय देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येसंदर्भात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना या हत्येच्या बाबतीत अनेक गोष्टींची माहिती दिली. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेमुळेही महाराष्ट्रात खळबळ उडाली. या दोन्ही घटनांसंदर्भात पीडितांना दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

देशमुख यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळलं असल्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासनात सामावून घेण्याचा म्हणजेच सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख यांची मुलं लहान असल्याने संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, असेही धस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पडलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांबाबतही असाच निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाणार आहे.

हे ही वाचा:

सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’ 

संतोष देशमुखांचे अखेरचे शब्द…आता बास करा, मला मारू नका!

अबब ! नितीन गडकरींनी करून दिला १२०० कोटींचा नफा!

दिल्ली विधानसभा निवडणूक: ५ फेब्रुवारीला मतदान; ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

त्याआधी, धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. ती भेट झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात जे सांगितलं होतं, तेच आश्वासन आम्हाला दिलं आहे. आरोपी असणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले आहेत. इथे गुन्हेगारांना माफ केलं जात नाही, हे दिसून येईल, तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

धनंजय देशमुख म्हणाले की, या गुन्ह्याचा तपास निष्पक्षपातीपणे व्हायला हवा, अशी भूमिका आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली असून त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. या गुन्ह्यामध्ये कोणीही असले तरी त्याला शिक्षा होणार असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या प्रकरणाच्या तपासासंबंधी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, “जे एफआयआर यासंदर्भात नोंदविण्यात आले आहेत, त्याप्रमाणेच आम्ही मुख्यमंत्र्यांना घटनाक्रम सांगितला. जेव्हा घटना घडली तेव्हाचे सर्वांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सर्व तपास करा, अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दोन दिवसात जो तपास झाला आहे त्याचा अहवाल आपल्याला मिळेल, असेही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले.

Exit mobile version