दिल्ली मद्यघोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना करण्यात आलेली अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नसल्याचे दिल्ली न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. संयज सिंह यांची बुधवारी तब्बल १० तास ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी १० ऑक्टोबरपर्यंत कोठडीत करण्यात आली आहे.
दिल्ली मद्यघोटाळा प्रकरणात परवाना देण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप संजय सिंह यांच्यावर आहे. हे पैसे संजय सिंह यांनी आरोपी आणि आता माफीचा साक्षीदार बनलेला दिनेश अरोरा यांच्याकडून घेतल्याचा आरोप सिंह यांच्यावर आहे. त्यामुळे ईडीने केलेले हे आरोप पाहता आपच्या खासदाराची अटक ही वॉरंटशिवाय किंवा कारणाशिवाय झालेली नाही, असे दिल्ली न्यायालयाने नमूद केले. आता माफीचा साक्षीदार बनलेल्या दिनेश अरोरा याने या कथित घोटाळ्यात संजय सिंह यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. तसेच, अरोरा याने हे दावे हे जाणुनबूजून करण्यात आल्याचे जबाबानुसार दिसत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
संजय सिंह यांना मिळालेल्या रकमेचा संपूर्ण माग काढण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित इतर घडामोडींचा शोध घेण्यासाठी त्याची सतत आणि कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे, असे दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
संजय सिंह विरुद्ध अरोरा आणि इतरांच्या आरोपांच्या सत्यतेची तपासणी सुनावणीदरम्यानच केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र तरीही तपासाच्या उद्देशाने, अशा विधानांवर विश्वास ठेवणे आणि त्यांनी दिलेला जबाब विचारात घेणे आवश्यक आहे, अशी पुस्तीही न्यायालयाने जोडली.
हे ही वाचा:
खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स
लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित
सिक्कीमच्या पुरात १४ जणांचा मृत्यू; १०२ जण बेपत्ता
बुधवारी अटक होण्यापूर्वी सिंग यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ‘मी मृत्यूला सामोरे जायलाही तयार आहे, पण घाबरणार नाही,’ असा संदेश त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सतत बोलत असतो. मी अदानींच्या भ्रष्टाचाराविरोधात ईडीकडे अनेक तक्रारीही केल्या आहेत. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. परंतु आज ईडीने अचानक माझ्या घरावर छापा टाकला. त्यांना काहीही मिळाले नाही. असे असूनही, ते मला अटक करत आहेत,’ असा दावा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.