खासदार संजय राऊत हे बेलगाम बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या अडीच तीन वर्षांत ते रोज सकाळी मीडियाशी संवाद साधताना आरोपांची राळ उडवत असतात. आता त्यांनी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर माझी सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. पण माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होतातच.
हे ही वाचा:
शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?
शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?
सोसायटीत खेळणाऱ्या लहानग्याला कुत्र्यांनी चावून मारले
खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे आणि गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात. तरीही एक गंभीर बाब आपल्या नजरेस आणून देतो. ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली आहे. ही सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता आपल्या कानावर हा विषय घालावा म्हणून हे पत्र लिहिले आहे.
संजय राऊत यांनी यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला आणि ते म्हणाले की, मला पोलिस संरक्षण नको आहे. मी मागितलेले नाही. मी स्वसंरक्षणासाठी समर्थ आहे. पण आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनाही अशा धमक्या आल्या आहेत.