संजय राऊतांना शिवडी दंडाधिकारी कोर्टाकडून १ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्वतः आरोप केल्यानंतरही त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयात हजर राहात नसल्याबद्दल दंडाधिकाऱ्यांनी हा दंड ठोठावला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली आहे. मात्र खटल्याला वारंवार राऊतांच्या गैरहजरीनं सुनावणी तहकूब होत असल्यानं कोर्टाने ही कारवाई केली आहे.
सोमय्यांनी १०० कोटी रुपयांचा शौचालय बांधकाम घोटाळा केल्याचा निराधार आरोप करून बदनामी केल्यासंदर्भात मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांना न्यायालयात खेचले आहे. पण आपले आरोप सिद्ध करण्यासाठी संजय राऊत एकदाही न्यायालयात हजर राहिलेले नाहीत. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
राऊतांच्यावतीनं वकिलांनी ते गैरहजर राहण्यासाठीचा अर्ज केला होता, जो फेटाळून लावत कोर्टानं राऊतांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी १० एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी
पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?
यासंदर्भात राऊत यांच्या वकिलांनी आजची सुनावणी तहकूब करा आणि आपले अशील न्यायालयात आलेले नाहीत. त्यावर न्यायालयाने वारंवार हजर राहात नसल्याबद्दल हा दंड ठोठावला.
मेधा सोमय्या यांनी ही याचिका दाखल केली तेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते. त्यावेळी त्यांनी आपल्यावरील आरोप मान्य नसल्याचे न्यायालयाला ऑनलाइन सुनावणीच्या माध्यमातून कळविले होते. पण प्रत्यक्षात ते कधीही न्यायालयासमोर उपस्थित राहिलेले नाहीत.
मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यात मेधा सोमय्या यांनी ही तक्रार दाखल केली पण त्यावर एफआयआर दाखल झाला नाही. तेव्हा मेधा यांनी न्यायालयाला विनंती करत संजय राऊत यांना नोटीस पाठविण्याची आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीची कारवाई करण्याची मागणी केली होती.