श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीने केले आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिर्डीतील साईबाबा मंदिर दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले असले तरी श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी नामक संस्थेकडून गुरुवारचे अन्नदान या आशयाखाली साईभक्तांकडून ऑनलाईन, पेटीएम, गुगल पे द्वारे देणगीची मागणी केली जात आहे. पण त्या संस्थेशी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
शिक्षणसेवकांचा एल्गार; मानधन कधी मिळणार?
पश्चिम बंगालच्या नागरिकांना पोलिसांचीच भीती
६ कोटी रुपये नक्की कोणाकडे जाणार होते? सरकारने उत्तर द्यावे
स्पुतनिक लस पुढील आठवड्यापासून खुल्या बाजार मिळणार
बगाटे यांनी यासंदर्भात जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र शिर्डी हे देशातील नामांकित देवस्थान असून साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्त शिर्डीत येत असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत श्री साईबाबा व संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेल्या बनावट संस्था, वेबसाईट, फेसबुक इत्यादि माध्यमातून साईभक्तांची फसवणूक किंवा दिशाभूल करून त्यांच्याकडून रोख रकमेच्या व ऑनलाइन स्वरूपात देणगी जमा करण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. त्यानुसार श्री साईबाबा सेवाभावी संस्थान, शिर्डी या संस्थेकडून गुरुवारचे अन्नदान या आशयाखाली देणगीची मागणी केली जात आहे. त्यामुळे साईभक्तांनी सावध राहावे. यासंदर्भात www.sai.org आणि online.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन बगाटे यांनी केले आहे.
कोरोनाच्या या काळात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाग्रस्तांना मदतीच्या नावाखाली लोकांकडून देणग्या गोळा करणे किंवा लोकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे वसूल करणे अशा घटना घडत आहेत. अशा प्रकरणांमुळे सायबर पोलिसांवरील कामाचा बोजा वाढला आहे.