अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणी जबरदस्त दणका बसला आहे. साई रिसॉर्ट पाडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. यापूर्वी खेड जिल्हा न्यायालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक अनियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्ञ समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे.

हे ही वाचा:

शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!

दिल्ली:निवासी इमारतीला आग, चार जणांचा मृत्यू!

पश्चिम बंगाल: शाहजहान शेखच्या ठिकाणांवर ईडीचा छापा!

उत्तर प्रदेशात एनडीएला मिळणार ७७ जागा

साई रिसॉर्टचे बांधकाम हे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून करण्यात आले असून यात मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. तर, अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावले होते. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचं हे साई रिसॉर्ट आहे. दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधीत प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली होती. याशिवाय साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते.

Exit mobile version