नवी दिल्लीत भररस्त्यात साक्षीची निर्घृण हत्या करणाऱ्या साहिल खानला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. साहिल खान याला अटक केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दोन दिवसांची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्याला पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता शनिवारी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
हत्येचे संपूर्ण दृश्य जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे त्याने केलेले हे नृशंस कृत्य जगापुढे येऊ शकले. साहिलने साक्षीवर ३४वेळा चाकूचे वार केले होते. ती गयावया करत असूनही साहिलच्या हृदयाला पाझर फुटला नाही. चाकूचे वार केल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर साहिलने जवळचा दगड उचलून तिला ठेचले. हा प्रसंग घडत असताना आजूबाजूच्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी साहिलला हत्येच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथील त्याच्या आत्याच्या घरातून अटक केली.
हे ही वाचा:
साहिल नशा करणारा, गुंडांच्या टोळीशी संबंध
राऊतांचे राजकारण थुकरट वळणावर!
दरवाजे सताड उघडे ठेवा पंकजाताई येणार नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा
पोलिस २० वर्षीय साहिलची कसून चौकशी करत आहेत. चौकशीत साहिलने हत्येपूर्वी मद्यप्राशनही केल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे साहिलला ही हत्या केल्याचा कोणताच पश्चाताप नाही. पोलिस सूत्रांनुसार, हत्या करण्यापूर्वी साहिलने काही वेबसीरिजही पाहिल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी नवी दिल्लीत आफताब नामक तरुणाने श्रद्धा वालकर या तरुणीची हत्या केली होती. हत्येनंतर आफताबने श्रद्धाचे तुकडे तुकडे केले होते. ही हत्या करण्यापूर्वी आफताबनेही ‘डेक्सटर’ नावाची वेबसीरिज पाहिली होती.
साहिल हा नशा करत असल्याचीही माहिती समोर आली असून त्या नशेतच त्याने ही हत्या केल्याचेही कळते आहे.