मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होता, असा संशय एटीएसने एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती मिळत आहे. एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सांगितलं जात आहे.
आपल्या चौकशी अहवलात एटीएसने लिहिले आहे की, मनसुख यांच्या हत्येनंतर रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी वाझे डोंगरी येथे गेला होता. त्या दिवशी यांना कोणाचाही कॉल आला नव्हता. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने टिप्सी बारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये सचिन वाझे ११ वाजून ३८ मिनिटांनी आपल्या कारमधून उतरताना दिसत आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?
कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन
मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर
मनसुख यांना तावडे नावाच्या व्यक्तीने रात्री ८ वाजून ३२ मिनिटांनी फोन केला. फोन केल्यानंतर मनसुख रिक्षाने ठाण्यातील खोपट परिसरातील विकास पाल्मस आंबेडकर रस्त्यावरून गेले. मनसुख यांच्याकडे स्वत:ची कार आणि तीन मोटरसायकल असताना देखील त्यांनी रिक्षाचा वापर केला. त्याच दिवशी मनसुख यांच्या पत्नीने रात्री ११ वाजता फोन केला असता फोन बंद होता. मनसुख यांच्याकडे एक मोबाईल होता. ज्यामध्ये दोन सिमकार्ड होते. एटीएसने त्या दोन्ही क्रमांकाचे सीडीआर काढले तेव्हा त्यामध्ये मनसुख यांना शेवटचा फोन हा ८ वाजून ३२ मिनिटांनी आला होता. त्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी चार मेसेज आले होते. चारही मेसेज आले तेव्हा त्यांचे लोकेशन वसई येथील मालजीपाडा दाखवत आहे. या सर्व घटनाक्रमानंतर एटीएसला अंदाज आहे की, मनसुख यांचे रात्री ९ च्या सुमारास अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांचा फोन काढून घेण्यात आला. त्यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत फेकण्यात आला.