वाझेला न्यायालयीन कोठडी…तळोजा जेलमध्ये रवानगी

वाझेला न्यायालयीन कोठडी…तळोजा जेलमध्ये रवानगी

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांत अटकेत असलेला आरोपी सचिन वाझे याला २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष सत्र न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वाझे याची रवानगी तळोजा येथील कोठडीत होणार आहे.

अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या या प्रकारणांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा सध्या तपास करत आहे. या तपासात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. शुक्रवार ९ एप्रिल रोजी वाझे याला एनआयएने विशेष सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी वाझे याच्याशी संबंधीत आणखीन मोठा खुलासा झाला आहे. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्यानंतर वाझे आणखीन काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करत होता असे सांगण्यात येत आहे. एनआयए तर्फे आज न्यायालयात यासंबंधीची माहिती देण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळे आता वाझेशी निगडीत नवीन काय गौप्य्स्फोट होतो याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

हे ही वाचा:

पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली

सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’

दरम्यान शुक्रवारी एनआयए न्यायालयाने वाझेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन आठवडे म्हणजेच २३ एप्रिल पर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. आजपर्यंत वाझे हा एनआयए कोठडीत होता. या न्यायालयीन कोठडीच्या आदेशामुळे वाझे याची रवानगी आता तळोजा येथील न्यायालयात होणार आहे. दरम्यान वाझे प्रकरणात न्यायालयाने आणखीन एक महत्वाचा आदेश दिला आहे. वाझे याच्या प्रकरणाशी संबंधीत कागदपत्र हाताळण्याची परवानगी सीबीआयला देण्यात आली आहे. सीबीआय सध्या परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या संदर्भात तपास करत आहे. या प्रकरणात वाझेचेही नाव असल्याने वांझेसी संबंधीत कागदपत्र हाताळण्याची परवानगी सीबीआयला देण्यात आली आहे.

वाझे प्रकरणाशी संबंधित शुक्रवारी पुन्हा एकदा प्रदीप शर्मा यांची एनआयए मार्फत चौकशी करण्यात आली. मुंबई येथील एनआयए कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. शर्मा यांच्या चौकशीचा हा सलग तिसरा दिवस होता. शर्मा यांच्या चौकशीतून काही महत्वाच्या गोष्टी बाहेर येऊ शकतात आणि या प्रकरणाला गती मिळू शकते असे म्हटले जात आहे.

Exit mobile version