सचिन वाझेने केला जामिनासाठी अर्ज

सचिन वाझेने केला जामिनासाठी अर्ज

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. वाझेच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले की, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) वाझेंच्या अटकेपासून आज ९० दिवस झाले तरी आरोपपत्र दाखल केलेले नाही, त्यामुळे त्याचा जामिन मिळावा. न्यायालयात या जामिन अर्जावरील सुनावणी २२ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

सचिन वाझेला एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर विशेष एनआयए न्यायालयाने एनआयएला आणखी २ महिन्यांचा कालावधी आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिला होता. यासंदर्भात एनआयएने म्हटले आहे की, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे वाझेने केलेल्या जामिनाच्या अर्जाला अर्थ नाही.

हे ही वाचा:

मुसळधार पावसात घरांवर बुलडोझर; नागरिक बेघर

ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला

अमरिंदर यांनी दिला सोनियांना इशारा

मराठी माणसाची घरे तोडणाऱ्या ठाकरे सरकारकडून भातखळकरांना अटक

एनआयएने ८ मार्चला हे स्फोटकांचे प्रकरण हाती घेतले तर २४ मार्चला मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. या दोन्ही प्रकरणात वाझेला प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. स्फोटक प्रकरणात वाझेच आधी चौकशी करत होता, पण नंतर स्फोटकांच्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याच्याशी त्याचे असलेले संबंध लक्षात घेता त्याला त्या चौकशी प्रक्रियेतून हटविण्यात आले. हिरेनचा मृतदेह ५ मार्चला खाडीत सापडला होता. वाझेने हिरेनकडून ती कार नोव्हेंबरमध्ये घेतली होती आणि मार्चमध्ये ती परत केल्याचे समोर आले होते.

Exit mobile version