आपल्या नावाने केल्या जाणाऱ्या बनावट जाहिरातींविरोधात सचिनची तक्रार

पोटाची चरबी कमी करण्यासाठी विकली जात होती उत्पादने

आपल्या नावाने केल्या जाणाऱ्या बनावट जाहिरातींविरोधात सचिनची तक्रार

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावाने पोटाची चरबी (बेली फॅट) घटवणारी उत्पादने विकणाऱ्या दोन बनावट वेबसाइट्स समोर आल्या आहेत. त्वचाविकार, केसांच्या समस्या, वेदनेपासून मुक्तता किंवा अन्य आरोग्याच्या समस्या या आयुर्वेदिक उत्पादनांमुळे दूर होतील, असा दावा या जाहिरातींच्या माध्यमातून केला जात होता. सचिनच्या स्वीय सहाय्यकाने या जाहिरातीची सचिनच्या छायाचित्रासोबतची लिंक शोधून काढल्यानंतर गुरुवारी पश्चिम विभागीय सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.

सचिन तेंडुलकरने स्वतः मुंबई क्राइम ब्रँचमध्ये जाऊन ही तक्रार नोंदविली. या बनावट कंपनीने ‘सचिन हेल्थ आय’ कॅश ऑन डिलिव्हरी इन इंडिया, अशी जाहिरात केली होती. ‘ज्यांना शारीरिक, त्वचेच्या किंवा केसांच्या काही समस्या आहेत, त्यांच्यासाठी ‘सचिन हेल्थ’ हे भारतातील लोकांसाठी प्रेमाने आणि काळजीपूर्वक बनवले गेले आहे. आमच्या वेदनाशामक उत्पादनांनी तुमचे आरोग्य व्यवस्थित होईल आणि तुमच्या पैशांचे पूर्ण मूल्य मिळेल, असे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो,’ असा दावा या जाहिरातीत केला होता.

‘आम्हाला एका कंपनीने सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा गैरवापर त्यांच्या सोशल मीडिया पेजेस आणि वेबसाइट्सवर बेकायदा केल्याचे आढळले. हा बेकायदा वापर चुकीचा असून त्यामुळे तेंडुलकरची प्रतिष्ठा खराब झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचीही दिशाभूल होत आहे,’ असे सचिनच्या स्वीय सहाय्यकाने त्यांच्या तक्रारीत म्हटले होते.

अतिरिक्त पोलिस आयुक्त शशी कुमार मीना (गुन्हे शाखा) यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारावर, तोतयागिरी, फसवणूक, फसवणूक करण्याच्या हेतूने खोटी जाहिरात, प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटी जाहिरात, बदनामी आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी वेबसाइट्सच्या निर्मात्याचे तपशील आणि ते कोठून चालवले जात आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी तपशीलही मागवले आहेत.

हे ही वाचा:

ट्विटरला मिळाली नवी सीईओ लिंडा याकारिनो

बहिणीच्या लग्नाला आली प्रियांका चोप्रा!

‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये

सागरी सीमा ओलांडून गेलेले १९८ मच्छिमार मायदेशात परतले

“मी बेली फॅट घटवणाऱ्या तेलाची शिफारस करणाऱ्या सचिनच्या नावाने केलेल्या जाहिरातीच्या वेबसाइट लिंक्स (sachinhealth. In, shylahealth. In) पाहिल्या. सोशल मीडियावरील उत्पादनाची लिंक ‘नवीन’ या यूजर आयडीने प्रकाशित केली होती. जाहिरातीत असेही नमूद करण्यात आले आहे की, ८९९ रुपये किमतीचा ‘फॅट मेल्टिंग स्प्रे’ ऑर्डर केल्यास तेंडुलकरची स्वाक्षरी असलेला मोफत टी-शर्ट मिळू शकेल. सचिनच्या नावाने तयार केलेल्या दोन वेबसाइटवर त्याची छायाचित्रे वापरून उत्पादने विकली जात होती, जी दिशाभूल करणारी आणि त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी बेकायदा वापरली होती,’ असे सचिनच्या वैयक्तिक सचिवाने सांगितले.

Exit mobile version