रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद या त्यांच्या १९८९ च्या अपहरणाशी सबंधित खटल्यादरम्यान शुक्रवार, १५ जुलै रोजी सीबीआय विशेष न्यायालयात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक आणि इतर तिघांना तिचे अपहरणकर्ते म्हणून ओळखले आहे.

८ डिसेंबर १९८९ रोजी श्रीनगरच्या लाल देड रुग्णालयाजवळून रुबैय्याचे अपहरण करण्यात आले होते आणि पाच दिवसांनंतर १३ डिसेंबर रोजी केंद्रातील तत्कालीन व्हीपी सिंग सरकारने तिच्या सुरक्षित परतीच्या बदल्यात पाच दहशतवाद्यांची सुटका केली होती. तिचे वडील त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते.

रुबैय्या सईद यांना या खटल्याच्या संदर्भात प्रथमच न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. रुबैय्या सईद या आता तामिळनाडूमध्ये राहतात, त्यांची केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंद केली आहे. तर टेरर फंडिंग प्रकरणात नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झालेला यासीन मलिक या खटल्यात आरोपी होता.

यापूर्वी २७ मे रोजी टाडा कोर्टाने रुबैय्या सईदला साक्षीदार म्हणून समन्स बजावले होते. न्यायालयाने त्यांना १५ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले होते. २५ मे रोजी, प्रतिबंधित संघटनेचा जेकेएलएफचा प्रमुख यासिन मलिकला २०१७ च्या दहशतवादी फंडिंग प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सीबीआयने रुबैय्या यांच्या अपहरणप्रकरणी मलिकसह दहा जणांवर आरोप निश्चित केले होते. मलिक व्यतिरिक्त, या प्रकरणात अली मोहम्मद मीर, मोहम्मद जमान मीर, इक्बाल अहमद गांद्रू, जावेद अहमद मीर, मोहम्मद रफिक पहलू, मंजूर अहमद सोफी, वजाहत बशीर, मेहराज-उद-दीन शेख आणि शोकत अहमद बक्षी यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

असंसदीय शब्दानंतर आता उपोषण, धरणेवरून विरोधकांचे रडणे!

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्रात लख्ख ‘उजाला’; राज्यात २.२ कोटी एलईडी बल्बचे वितरण

८ डिसेंबर १९८९ रोजी देशाचे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद हिचे यासिन मलिक आणि इतर दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्या बदल्यात विविध तुरुंगात बंद असलेल्या पाच दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. २५ जानेवारी १९९० रोजी यासिन मलिक आणि इतर जेकेएलएफ दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले होते.

Exit mobile version