झारखंड काँग्रेस खासदाराच्या घरात सापडले १०० कोटी रोख!

छापा टाकण्यात आलेली मद्य कंपनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबीयांची

झारखंड काँग्रेस खासदाराच्या घरात सापडले १०० कोटी रोख!

झारखंडचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात आतापर्यंत १०० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. ओडिशा आणि झारखंडमधील काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात येत आहेत. बुधवारपासून सुरू झालेला हा छापा अजूनही सुरूच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने आयकर विभागाकडून त्या मोजण्यासाठी मोठमोठ्या मशीनचा वापर केला जात आहे.

आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुद्धिस्ट डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित असलेल्या जागेवर हे छापे टाकण्यात येत आहेत. बुद्धिस्ट डिस्टिलरी ही राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबाची कंपनी आहे. धीरज साहू यांचे कुटुंब दारूच्या व्यवसायाशी निगडीत आहे. ओडिशात त्यांचे अनेक दारू निर्मितीचे कारखाने आहेत.

आयकर विभागाने झारखंडमधील बोलंगीर आणि ओडिशातील संबलपूर येथील धीरज साहू यांच्या वडिलोपार्जित घरावर छापे टाकले आहेत. झारखंडमधील रांची आणि लोहरदगा येथील येथील आस्थापनांवरही छापे टाकले जात आहेत. या छाप्यात आतापर्यंत १०० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती

फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने

झिम्बाब्वे-आयर्लंड दरम्यान झाला रोमांचक सामना!

श्रीसंत आणि वादाचे जुने नाते

या मुद्द्यावरून राजकारणही तीव्र झाले आहे. भाजपने काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार दीपक प्रकाश यांनी ट्विट करून म्हटले आहे की, काँग्रेस खासदाराच्या घरातून एवढी रोकड सापडली आहे, तेव्हा या पक्षाने ७० वर्षांत देशाला किती पोकळ केले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. हेमंत सरकारच्या काळात झालेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्याबद्दल आपण बोलतो तेव्हा तो केवळ आकडा नसून वास्तव आहे, त्याचे एक छोटेसे उदाहरण पुन्हा आपल्यासमोर आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अमर बौरी यांनी ट्विट करून टीका केली आहे की,मला माहिती मिळाली आहे की खूप मोठी रक्कम सापडली आहे आणि ही रक्कम मोजताना मशीन देखील बंद पडली आहे.दरम्यान, भाजपकडून या प्रकरणी ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.

Exit mobile version