वेबसीरिजच्या गुंतवणुकीतून फसवणूक करणारी अभिनेत्री अटकेत

वेबसीरिजच्या गुंतवणुकीतून फसवणूक करणारी अभिनेत्री अटकेत

वेबसीरिजसाठी घेतलेल्या सुमारे ३७ लाख रुपयांचा फसवणुकीप्रकरणी रोशन गॅरी बिंदर या महिलेस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. रोशन बिंदर ही प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक म्हणून परिचित आहे. अटकेनंतर तिला मंगळवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

५० वर्षांची तक्रारदार महिला अंधेरीतील यारीरोड-वर्सोवा परिसरात राहत असून त्या व्यावसायिक आहेत. त्यांनी रियल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांच्याच इमारतीमध्ये मालिका अभिनेता हितेन जेठानंद तेजवानी हे राहतात. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. दुसरीकडे हितेन हा सिनेसृष्टीशी संबंधित असल्याने त्याची रोशन बिंदर यांच्याशी ओळख होती. या तिघांनी एक वेबसिरीज बनविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हितेनच्या सांगण्यावरुन तक्रारदार महिला ३७ लाख रुपये गुंतवणूक करण्यास तयार झाली होती.

द अदर्स (डी कोड) नावाची ही वेबसिरीज पूर्ण झाल्यानंतर त्याचे हक्क हार्ड डिस्क, उल्लू डिजीटल प्रायव्हेट लिमिटेड चॅनेलला विकून त्यातून आलेल्या रक्कमेतून त्यांना गुंतवणूक केलेली रक्कम परत केली जाईल आणि उर्वरित नफा तिघांमध्ये समान वाटप होईल असे सांगण्यात आले. त्यासाठी या तिघांच्या नावाने एक संयुक्त खाते उघडण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात निर्माता म्हणून रोशन बिंदर तर सहनिर्माता म्हणून तक्रारदारासह हितेन यांचे नाव देण्यात येणार होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीत ३७ लाख रुपयांची गुुंतवणूक केली होती. मात्र बँकेत जमा झालेल्या या पैशांचा रोशन बिंदर यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणूक केली होती.

 

हे ही वाचा:

अभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध गुन्हा दाखल

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अंतरिम वाढ करता येईल का, असा शासनाचा प्रस्ताव

टिपलेला झेल, वाचवलेली धाव आणि अचूक फेक सामन्याचा कौल बदलतात!

ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…

 

याबाबत विचारणा करुन तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. तसेच त्यांच्यासोबत झालेला करार रद्द केला होता. पैशांची मागणी केल्यांनतर तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण पैसे देणार नाही असा पवित्रा घेतला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी रोशन बिंदरविरुद्ध वर्सोवा पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर रोशनविरुद्ध पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी तिला पोलिसांनी अटक केली. सध्या ती पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तिने अशाच प्रकारे इतरांना गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची फसवणूक केली आहे का, याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

Exit mobile version