‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद

आरोपींना क्लीन चिट

‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद

तेलंगणा पोलिसांनी हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला यांच्या मृत्यूचा तपास बंद केला आहे. या प्रकरणात आरोपी असलेले माजी कुलगुरू आणि भाजप नेत्यांना पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला यांच्या मृत्यूच्या चौकशीचा निष्कर्ष काढून तेलंगणा पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. जानेवारी २०१६मध्ये वेमुलाने आपले जीवन संपवले होते.

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, त्याची खरी जात उघड होईल, या भीतीने वेमुलाने आत्महत्या केली. त्याने स्वतःची ओळख अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे नमूद केले होते. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सन २०१५मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाला विद्यापीठातील ‘जातीयवादी, अतिरेकी आणि देशविरोधी राजकारणाबद्दल पत्र लिहिले. त्यामुळे वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केले गेल्याचा आरोप झाला.

या अहवालात हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू अप्पा राव आणि सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी आमदार एन रामचंदर राव आणि अभाविप नेत्यांसह भाजप नेत्यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

‘रोहित वेमुला हे अनुसूचित जाती (एससी) समुदायाशी संबंधित नव्हते आणि त्यांच्या आईने त्यांना त्याचे प्रमाणपत्र मिळवून दिले होते, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे आपली खरी जात उघड होईल आणि आपण मिळवलेल्या आतापर्यंतच्या शैक्षणिक पदव्यांवर आपल्याला पाणी सोडावे लागेल व खटल्याला सामोरे जावे लागेल, या भीतीने त्यांना सतत ग्रासले होते,’ असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. वेमुलापुढे अनेक समस्या होत्या. त्यामुळे त्याने जीवन संपवले असावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

आरोपींच्या कृत्यांमुळे वेमुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडला नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र वेमुला यांचा भाऊ राजा यांनी पोलिसांचे दावे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली. याबाबत आपण तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे, एक पोलिस अधिकारी एखाद्या व्यक्तीची जात ठरवू शकत नाही. आम्ही शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहोत. आम्ही निषेध याचिका दाखल करू आणि इतर पर्यायही बघितले जातील,’ असे राजा वेमुला म्हणाले.

हे ही वाचा:

अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!

पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!

पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…

नकली सेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यात सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत आहे?

वेमुलाच्या नातेवाइकांनी तपासाबाबत शंका उपस्थित केल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास करणार असल्याचे सांगितले. ‘तपासावर मृत रोहित वेमुलाच्या आई आणि इतरांनी काही शंका व्यक्त केल्यामुळे, या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पुढील परवानगी देण्याची विनंती करणारी याचिका माननीय दंडाधिकाऱ्यांना संबंधित न्यायालयात दाखल केली जाईल, असे तेलंगणाचे पोलिस आयुक्त यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version