एका आंगडियाच्या कार्यालयात शस्त्राचा धाक दाखवून ७० लाखांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी मुलुंड पश्चिम येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी ४ ते ५ अनोळखी दरोडेखोरां विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या कसून शोध घेण्यात येत आहे.
मुलुंड पश्चिम पाच रस्ता या ठिकाणी असलेल्या एका इमारतीत व्ही पटेल फार्म नावाने अंगाडीयाचे कार्यालय आहे. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आलेल्या पाच शस्त्रधारी दरोडेखोरांपैकी चार जण कार्यालयात घुसले. आणि एक जण कार्यालयाबाहेर पाळत ठेवून होता. कार्यालयात घुसलेल्या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हर आणि चॉपरचा धाक दाखवून कार्यालयात जमा झालेली ७० लाख रुपयांची रोकड जबरीने घेऊन पोबारा केला.
घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी दरोड्याचा घटनेची माहिती मालकांना दिली. आंगडियाने याप्रकरणी मुलुंड पोलिसांना दरोड्याची माहिती दिली. मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावर असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!
अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!
वाझे प्रकरणामुळे मुख्यमंत्री गाळात
‘वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा असल्याचा ठाकरे सरकारला पवारांचा सल्ला’
४ते ५ दरोडेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या सहाय्याने दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक चौकशीत दरोडेखोरांनी ७० लाख रुपयांची रोकड पळवल्याचे समोर येत असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.