मुंबईत ज्वेलर्स दुकानावर खुनी दरोडा; मालकाची हत्या

मुंबईत ज्वेलर्स दुकानावर खुनी दरोडा; मालकाची हत्या

लाखोंच्या ऐवजासह दरोडेखोरांनी काढला पळ

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे एका ज्वेलर्स शॉपवर बुधवारी सकाळी खुनी दरोडा टाकण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी दुकानात गोळीबार करून दुकान मालक शैलेंद्र पांडे यांची हत्या करून लाखो रुपयांच्या ऐवजासह पोबारा केला आहे. या दरोड्याचा घटनेनंतर मात्र येथील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहिसर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलीसानी दरोडेखोरांच्या शोध घेण्यासाठी जागोजागी नाकाबंदी लावली आहे.

हे ही वाचा:
इंग्लंड, युक्रेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

ठाकरे सरकार सत्तेच्या नशेत धुंद

पित्याने तीन मुलांना आईस्क्रीम मधून दिले विष; एकाचा मृत्यू

आरबीआयची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई

दहिसर येथील रावळपाडा, गावडे नगर येथील ओम साईराज ज्वेलर्स दुकानात बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ऍक्टिव्हा या दुचाकीवरून आलेल्या १८ ते २५ वयोगटातील दरोडेखोरांनी दुकान मालकाला कुठलीही संधी न देता त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर या दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने, वजनदार असलेली ट्रॅव्हल्स बॅग घेऊन आलेल्या दुचाकीवरून पोबारा केला. काही मिनिटात झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी दाखल झालेल्या दहिसर पोलिसांनी जखमी दुकानमालकाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले.

याप्रकरणी पोलिसांनी हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून लुटारूंचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लुटारू हे १८ ते २५ वयोगटातील असून त्यांनी चेहऱ्यावर मास्क घालून ग्रे रंगाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून पोबारा केला आहे. या लुटीत लाखो रुपये किमतीच्या सोन्याची लूट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version