वृद्ध महिलेला लुटणारी टोळी २४ तासांत जेरबंद

वृद्ध महिलेला लुटणारी टोळी २४ तासांत जेरबंद

वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला  मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला  भायखळा पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. अटक करण्यात आलेली टोळी गुजरात राज्यात राहणारी असून या टोळीत एका महिलेचा समावेश आहे.

मनाली रॉबिन बेडवेवाला (३१) , राहुल सिंग नानक सिंग खंडेलवाल (२७) झाकीर अब्दुल लतिफ शेख, (२७) आणि मो.रईस मो. रफिक शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी लाल बाजार, जुनी कोर्ट बिल्डिंग, भरूच, गुजरात येथे राहणारी आहे.

भायखळा येथील माझगाव, ताडवाडी सेंटर रेल्वे कंपाउंड या ठिकाणी मिठीबाई मकवाना (७८) या वयोवृद्ध महिला एकट्याच राहतात. सोमवारी सकाळी मिठीबाई ह्या घरात देवपूजा करीत असताना दोन इसम घरात घुसले व मिठीबाई यांना मारहाण करून त्यांच्या हातातील बांगड्या काढून पोबारा केला होता. या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मारहाणीत जखमी झालेल्या मिठीबाई या वृद्धेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला. भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास माने, पो.उ.नि. रुपेश पाटील, दत्तात्रय जाधव, खैरमाटे, पाटोळे आणि पथक  यांनी दरोडेखोरांचा शोध घेतला असता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दरोडेखोराच्या मोटारीचा नंबर सापडला. पोलिसांनी या मोटारीचा माग काढला असता सदर मोटार ही गुजरातच्या दिशेने गेल्याचे कळले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी गुजरात पोलिसांची मदत घेऊन  दरोडेखोरांची मोटार गुजरातच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आली. या मोटारीच्या मागावर असलेले भायखळा पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून मोटारीसह मुंबईत आणण्यात आले. अधिक चौकशीत दरोडेखोरांनी चोरलेल्या वृद्धेच्या बांगड्या  पितळेच्या निघाल्या आहेत. बांगड्या पितळेच्या असल्याची  कल्पना आरोपीना देखील नव्हती, अशी माहिती अशोक खोत यांनी दिली.

या प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला मनाली रॉबिन बेडवेवाला  घटस्फोटित आहे व तिचे राहुलसिंग नानक सोबत प्रेमप्रकरण सुरू आहे. पूर्वी ही महिला भायखळा ताडवाडी येथे नातेवाईकाकडे राहण्यास असल्यामुळे तिला या विभागाची माहिती होती. तसेच मिठीबाई ही वृद्धा घरात एकटीच राहते आणि तिच्याकडे भरपूर दागदागिने आणि पैसाअडका असल्याची तिला कळले होते.

हे ही वाचा:

शेअर बाजारात सध्या स्टील शेअर्सना पसंती

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा… मोदींची खोचक टीका

‘यमा’लाही मिळाली ‘माय’

 

आर्थिक चणचण असल्यामुळे मनालीने ही लुटीची योजना आखली आणि मनाली आणि तिच्या प्रियकराने या लुटीत आणखी दोघांना सहभागी करून घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version