महाराष्ट्रात सध्या बँक लुटण्याचे सत्र सुरू असून बँक दरोड्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. भर दिवसा बँकेत शिरून बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये, दागिने दरोडेखोर सहज लुटून जात आहेत. बँकेत ठेवलेले दागिने आणि पैसेही आता सुरक्षित नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेवर दरोडा टाकल्याची घटना आज (३० ऑक्टोबर) सकाळी समोर आली. दरोडेखोरांनी बँकेच्या तिजोरीतून २० लाखांची रोकड लंपास केली आहे. बँकेच्या शिपाईने बँक उघडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दहा दिवसात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये विविध बँकांवर हे दरोडे पडले आहेत. यापैकी दोन दरोडे हे भर दिवसा पडले. तर चौथा दरोडा बुलडाण्यात रात्रीच्यावेळी पडला. चोरांचा बँकेवरील दरोड्याचा प्रकार म्हणजे लुटीचा नवा पॅटर्न आहे की का? असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे आरोपींना आता पोलिसांचा धाक राहिलेला नाही.
बुलडाणा जिल्ह्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली. सकाळी शिपाई बँकेत आल्यानंतर बँकेत दरोडा पडल्याची माहिती समोर आली. दरोड्याची माहिती मिळताच बुलडाणा येथून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस श्वानपथकाद्वारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा
भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?
मोदी-पोप बैठकीत काय चर्चा होणार?
दरोडेखोर बँकेच्या इमारतीचे खिडकीचे गज वाकवून बँकेत शिरले आणि त्यांनी बँकेतील तिजोरी गॅस कटरने कापून रोकड पळविली. जेव्हा सकाळी शिपाई बँकेत आला तेव्हा खिडकीचे गज वाकवले गेल्याचे पाहून त्याला चोरीचा संशय आला. त्याने ही बाब बँकेच्या अधिकाऱ्यांना कळवली. अधिकाऱ्यांनी बँकेत येत पाहणी करुन तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली. यावेळी श्वान पथकाने बँकेच्या बाजूच्या शेतापर्यंत माग घेतला असता तिथे दरोडेखोरांचे हँडग्लोज आणि बॅटरी सापडली. दरम्यान, सीसीटीव्हीत दोन दरोडेखोर कैद झाल्याची शक्यता आहे.
दरोड्याची पहिली घटना ही पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे महाराष्ट्र बँकेत घडली होती. बँकेवरील दरोड्याची दुसरी घटना ही जालना जिल्ह्यात घडली होती. तिसरी घटना ही काल सोलापुरात घडली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला होता.