पाण्यात भिजवलेली बिस्कीट आणि अंगावर खाज येणारी पावडर याच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. एकूण पाच जणांची टोळी अशा चोरी करत असल्याचे समोर आले आहे. पाण्यात भिजवलेली बिस्कीट आणि खाज येणारी पावडर वापरून लोकांचे लक्ष विचलित करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास करण्याचे काम ही टोळी करत असे. टोळीतील सुरेश नायडू आणि कृष्णा शेट्टी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे; तर त्यांचे इतर तीन साथीदार शेट्टीचे वडील उदय आणि इतर दोघांचा तपास पोलीस करत आहेत.
या टोळीने तीन वेगवेगळ्या लोकांकडून १.५ लाख रुपये, सोन्याची साखळी आणि ४० हजार रुपये असा ऐवज लंपास केला होता. टोळीतील पाचही जण कर्नाटकचे रहिवासी असून ते चोरी करण्यासाठी शहरात येत आणि भाड्याने घर घेऊन राहत असत. त्यांच्या अंबरनाथ येथील भाड्याच्या घरातून अंगाला खाज येण्याची पावडर, बिस्कीट पुडे आणि रोख रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वांगते यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचा ‘हा’ नवा विक्रम
खरमाटे यांच्याकडे ७५० कोटींची प्रॉपर्टी
अरबी समुद्रात नौकानयनपटूंनी भरली शिडात हवा
टोळीविरुद्ध पहिली तक्रार १७ ऑगस्टला वाहन चालक असलेले शीतल मिश्रा यांनी केली होती. मिश्रा यांच्याकडे त्यांच्या ऑफिसची रक्कम असलेली बॅग होती. पहिले एका आरोपीने नकळत त्यांच्या मानेवर खाज येणारी पावडर टाकली आणि भिजलेले बिस्कीट अंगावर टाकले. दुसऱ्या एका आरोपीने त्यांना त्यांच्या शर्टवर डाग असल्याचे भासवले. मात्र; तो डाग नसून भिजलेले बिस्कीट आहे हे मिश्रा यांना तेव्हा समजले नाही. डाग काढण्यासाठी मदत करायच्या बहाण्याने त्यांनी मिश्रा यांना बाजूला नेले आणि मिश्रा यांनी डाग काढण्यासाठी म्हणून हातातील बॅग खाली रस्त्यावर ठेवताच आरोपींपैकी एकाने ती बॅग लंपास केली. अशाच पद्धतीने त्यांनी भुलेश्वरमधील एका सोनाराची चैन लंपास केली आणि एकाचे ४० हजार लंपास केले, असे पोलिसांनी सांगतले.