ऋषभ पंतला दीड कोटींचा चुना

माजी क्रिकेटपटूकडून अनेकांची फसवणूक

ऋषभ पंतला दीड कोटींचा चुना

ताज पॅलेससह मोठ्या लग्झरी हॉटेलांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या २५ वर्षीय माजी क्रिकेटपटूला दिल्ली पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अटक केली. या आरोपीचे नाव मृणांक सिंह असे असून त्याने दिल्लीतील ताज पॅलेसची जुलै २०२२मध्ये साडेपाच लाखांची फसवणूक केली होती. तर, सन २०२० ते २०२१ दरम्यान त्याने ऋषण पंत यालाही तब्बल एक कोटी ६३ लाखांचा चुना लावला होता.

मृणांक सिंह हा हरयाणाच्या १९ वर्षांखालील संघातून खेळला असून त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात असल्याचा दावा केला आहे. तो कर्नाटकचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार असल्याचे भासवून अनेक लग्झरी हॉटेलांची फसवणूक करत असे, असे पोलिसांनी सांगितले.

‘ताज पॅलेस’कडून तक्रार

या प्रकरणी जुलै २०२२मध्ये दिल्लीतील ताज पॅलेसच्या व्यवस्थापनाने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये मृणांक सिंह या हॉटेलमध्ये आठवडाभरासाठी राहिला होता आणि जवळपास पाच लाख ५३ हजार ३६२ रुपयांचे बिल न भरताच तो निघून गेला होता. जेव्हा त्याला बिल भरण्याबाबत सांगण्यात आले, तेव्हा त्याने आपली प्रायोजक कंपनी आदिदास हे बिल अदा करेल, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मयांककडे बँकेची माहिती दिली असता त्याने दोन लाख रुपये भरल्याचे सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांना ते पैसे मिळाले नाहीत.

त्यानंतर मृणांक आणि त्याचा मॅनजेर गगन सिंह याला संपर्क साधला असता ते ड्रायव्हरसह रोख रक्कम पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने अशीच थातूरमातूर कारणे दिली. अखेर त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मृणांकच्या पत्त्यावर नोटीसही पाठवली होती, मात्र तो पोलिस ठाण्यात आला नाही. त्याच्या वडिलांनीही त्याला घरातून हाकलून लावले असल्याचे सांगितले.

हाँगकाँगला पळून जाण्याचा प्रयत्न

मृणांक सारखी जागा बदलत असल्याने तसेच, त्याचा फोनही बंद असल्याने त्याचा माग काढता येत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉर्ट काढले आणि देशाबाहेर पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केल्यास त्याला अटक करण्याची लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली. अखेर २५ डिसेंबर रोजी दिल्लीतील आयजीआय विमानतळावरून हाँगकॉँगला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत त्याने अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंट, तरुण मुली, टॅक्सीचालक, खाण्याचे छोटे स्टॉल यांनाही फसवल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा:

राजनाथ सिंह यांनी पाठीवर हात ठेवत दिला दिलासा

बाजारात तुरी… पण संपत नाही हाणामारी

पुण्यातील विमाननगर भागात १० सिलिंडर फुटले!

काशीच्या संतांकडून २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची मागणी!

ऋषभ पंतची १ कोटी ६३ लाखांची फसवणूक

सन २०२२मध्ये मृणांकने ऋषभ पंतला आपण लग्झरी वस्तूंचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवले होते. त्यानंतर पंतने महागडी घड्याळे घेण्यासाठी पैसे दिले होते. तसेच, तो यांची विक्री चांगल्या किमतीला करेल, या हेतूने त्याच्याकडच्या काही महागड्या वस्तू दिल्या होत्या. मात्र याबाबत पुढे काहीच झाले नाही. पंतने याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्या दोघांमध्ये एक कोटी ६३ लाख रुपयांत तडजोड झाली होती. मात्र मृणांकने दिलेला हा चेक बाऊन्स झाला.

Exit mobile version